नवी मुंबई : पनवेल येथून जेएनपीटी रोडने नेरूळ येथे परतणाऱ्या तरुणांच्या मारुती सुझुकी सेलेरियो कारवरील चालकाचे नियंत्रण सुटल्याने सदर कार ट्रेलरवरून रस्ता दुभाजकावर धडकल्याने झालेल्या अपघातात एका तरुणाचा जागीच मृत्यू, तर कारचालकासह दोघे जण गंभीर जखमी झाल्याची घटना गुरुवारी सकाळी पनवेलजवळ घडली. पनवेल शहर पोलिसांनी या अपघाताला जबाबदार असलेल्या कारचालकाविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.
या अपघातात मृत झालेल्या तरुणाचे नाव विकेश विलास तांबे (३२) असे असून जखमी झालेल्या त्याच्या मित्रांची नावे तेजस रवींद्र पालांडे (२५) व सुजित चंद्रकांत खोसे (२६) अशी आहेत. हे तिघेही नेरूळमध्ये राहण्यास असून बुधवारी रात्री ते पनवेल येथे पार्टीसाठी गेले होते. पार्टी संपवून तिघेही गुरुवारी पहाटेच्या सुमारास मारुती सुझुकी सेलेरिओ कारने नेरुळ येथे परतत होते. तेजस पालांडे हा कार चालवत होता, त्याच्या बाजूला विकेश तांबे बसला होता, तर पाठीमागे सुजित खोसे बसला होता. सकाळी ६ वाजण्याच्या सुमारास भरधाव वेगात असलेली त्यांची कार पळस्पे-जेएनपीटी रोडवरील जेएडब्ल्यू कंपनीसमोर आली असताना, तेजस पालांडे याचे कारवरील नियंत्रण सुटले.
सदर कार प्रथम ट्रेलरवर धडकली, त्यानंतर सदर कार रस्ता दुभाजकावर धडकली. या भीषण अपघातात कारमधील तिघेही गंभीर जखमी झाले. मात्र त्यातील विकेश तांबे याचा जागीच मृत्यू झाला. या अपघाताची माहिती मिळताच पनवेल शहर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन जखमी असलेल्या तेजस आणि सुजित या दोघांना रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले. या अपघातात कार चालक तेजस पालांडे याने अतिवेगाने व बेदरकारपणे कार चालविल्यामुळे त्याचे कारवरील नियंत्रण सुटून सदर अपघात झाल्याचे आढळून आले आहे.