
नवी मुंबईतील वाशी एपीएमसी मार्केटमध्ये मागील आठवड्यात कांद्याच्या दराने उच्चांक गाठला. दरात सातत्याने वाढ होत असल्याने कांद्याने ग्राहकांच्या डोळ्यात पाणी आणले. प्रति किलो ३५ ते ३६ रुपयांवर गेलेल्या कांद्याने ग्राहक चिंतेत सापडले. मात्र सोमवारपासून सुरु झालेल्या बाजारात कांद्याच्या दारात ५ ते ६ रुपयांनी घसरण झाली असून प्रति किलो ३० रुपयांवर आलेला आहे. सद्यस्थितीत मध्य प्रदेशमधील कांद्याची आवक वाढत आहे. या कांद्याच्या मागणीच्या तुलनेत पुरवठा जास्त असल्याने राज्यात कांद्याच्या दरात घसरण होत आहे.
एपीएमसी घाऊक बाजारात दोन आठवड्यापूर्वी कांद्याचे दर स्थिर होते. परंतु मागील आठवड्यात कांद्याच्या दरात सातत्याने वाढ होऊन ५ ते १० रुपयांची वाढ झाली. त्यामुळे बाजारातही कांदा ४० ते ४५ रुपयांवर गेला. मागील एक ते दोन महिन्यांत राज्यात परतीचा पाऊस मोठया प्रमाणात झाला. त्यामुळे साठवणूकीचा जुना कांदा मोठ्या प्रमाणावर खराब होत आहे. तर नवीन लाल कांद्याच्या हंगामालाही फटका बसला आहे. परिणामी बाजारात चांगल्या दर्जाचा कांदा कमी प्रमाणात दाखल होत आहे. चांगल्या दर्जाच्या कांद्यामुळे दरवाढ होत होती. परंतु सध्या राज्यात मध्यप्रदेश येथील कांद्याची आवक होत असून इतर राज्यातही मध्यप्रदेश मधील कांदा मोठ्या प्रमाणावर विक्री होत आहे. याचा परिणाम राज्यातील कांद्याच्या दरावर होऊ नये म्हणून नाशिक बाजारात कांद्याचे दर कमी करण्यात आल्याचे व्यापारी मनोहर तोतलानी यांनी सांगितले. सोमवारी एपीएमसी बाजारात एकूण १५० गाड्या दाखल झाल्या तर मंगळवारी १५७ गाड्यांची आवक बाजारात दाखल झाली. दरम्यान, मागील आठवड्याच्या तुलनेत दरात ५ ते ६ रुपयांनी घट झाली असून सध्या एपीएमसी बाजारात २० ते ३० रुपयांनी विक्री होत असल्याचे कांदा-बटाटा व्यापारी सुरेश शिंदे यांनी सांगितले.