मोरबे धरण परिसरात फक्त २७.६ मिमी पाऊस; नवी मुंबई शहरात ८४.३७ मिमी, १४ झाडे पडली

नवी मुंबई शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या मोरबे धरण परिसरातही यंदा पावसाने ओढ दिल्यामुळे शहरावर पाणी कपातीचे संकट ओढवले आहे.
मोरबे धरण परिसरात फक्त २७.६ मिमी पाऊस; नवी मुंबई शहरात ८४.३७ मिमी, १४ झाडे पडली
Published on

नवी मुंबई : पाणीपातळी कमी झाल्याने कधी नव्हे ते नवी मुंबईकरांना पाणी टंचाईला सामोरे जावे लागत आहे. सध्या पावसाने सर्वत्र जोर पकडला असला, तरी नवी मुंबई शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या मोरबे धरण परिसरातही यंदा पावसाने ओढ दिल्यामुळे शहरावर पाणी कपातीचे संकट ओढवले आहे.

मागील दोन दिवसांपासून पावसाचा जोर वाढला असून, गेल्या २४ तासांत नवी मुंबई शहरात जोरदार पाऊस पडला आहे. नवी मुंबई शहरात एका दिवसात ८४.३७ मिलिमीटर पावसाची नोंद झाली, तर याच्या तुलनेत नवी मुंबई शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या मोरबे धरणात मात्र दिवसभरात फक्त २७.६ मिलीमीटर पावसाची नोंद झाली आहे. नवी मुंबई शहरात जोरदार पावसाबरोबरच सोसाट्याच्या वाऱ्यामुळे १४ झाडे कोसळली असून, सीवूड्स परिसरात सिडकोनिर्मित सोसायटीत एका घराचा छताचा भाग कोसळला असल्याची घटना घडली आहे.

यंदाच्या पावसाळ्यात मोरबे धरण परिसरात एकूण ८०२.२ मिमी पावसाची नोंद झाली आहे. यंदा मोरबे धरण परिसरात ९ जूनला पावसाला सुरुवात झाली आहे. आतापर्यंत मोरबे धरणात जवळजवळ गेल्या वर्षी एवढाच पाऊस झाला असून, अजूनही जोरदार पावसाची अपेक्षा आहे. शहरात दिवसभरात सोसाट्याच्या वाऱ्यामुळे नवी मुंबईत १४ झाडेही कोसळली आहेत. यंदाच्या पावसाळ्यात पावसाने ओढ दिल्यामुळे नवी मुंबईकरांचे डोळे पावसाकडे लागलेले आहेत. धरण परिसरात थोड्याफार प्रमाणात पाऊस पडत असला तरी अजूनही पावसाचा जोर कमीच आहे.

सीवूड्स येथे छताचा भाग कोसळला

सीवूड्स सेक्टर ४८ न्यू ओमकार सोसायटी डी २४/४ मधील रहिवाशी सुप्रिया मरगज यांच्या सदनिकेचा बेडरूममधील जवळपास ७० टक्के छताचा प्लास्टरचा भाग कोसळल्याची घटना रविवारी घडली आहे. परिवारातील कोणीही बेडरूममध्ये नसताना ही घटना घडली आहे. त्यामुळे सुदैवाने कोणतीही जीवितहानी झाली नाही.

धरणात ३२.५२% पाणीसाठा

यंदाच्या पावसाळ्यात मोरबे धरणात ८०२. २ मिलिमीटर पावसाची नोंद झाली आहे. आजच्या दिवशी धरणात ३२.५२% पाणीसाठा झाला आहे. मागील काही दिवसांपासून पावसाला सुरुवात झाली असली, तरी नागरिकांनी पाण्याचा वापर जपून करावा, असे आवाहन नवी मुंबई महापालिकेतर्फे करण्यात आले आहे.

logo
marathi.freepressjournal.in