पोलीस अधिकारी, कर्मचाऱ्यांच्या आरोग्यासाठी ओपन जिम; सीबीडी पोलीस ठाण्याच्या उपक्रमाचे पोलीस आयुक्तांकडून कौतुक

नवी मुंबईचे पोलीस आयुक्त मिलिंद भारंबे यांनी पोलीस आणि नागरिक यांच्यासाठी वेगवेगळे उपक्रम सुरू करून आपल्या कामाचा वेगळा ठसा निर्माण केला आहे...
पोलीस अधिकारी, कर्मचाऱ्यांच्या आरोग्यासाठी ओपन जिम; सीबीडी पोलीस ठाण्याच्या उपक्रमाचे पोलीस आयुक्तांकडून कौतुक

नवी मुंबई : पोलिसांना कामाच्या ठिकाणीच मिळालेल्या थोड्या वेळाचा सदुपयोग करून स्वतःच्या आरोग्याची काळजी घेता यावी, या उद्देशाने वरिष्ठ पोलीस निरीक्षक गिरीधर गोरे यांनी सीबीडी पोलीस ठाण्याच्या आवारामध्ये पोलीस अधिकारी, कर्मचाऱ्यांसाठी ओपन जिम तसेच बॅडमिंटन कोर्टची स्थापना करण्यात आली आहे. सीबीडी पोलीस ठाण्याच्या आवारात सुरू करण्यात आलेल्या ओपन जिम व बॅडमिंटन कोर्ट या उपक्रमाचे पोलीस आयुक्त मिलिंद भारंबे यांनी कौतुक केले.

नवी मुंबईचे पोलीस आयुक्त मिलिंद भारंबे यांनी पोलीस आणि नागरिक यांच्यासाठी वेगवेगळे उपक्रम सुरू करून आपल्या कामाचा वेगळा ठसा निर्माण केला आहे. इएमसी (मध्यवर्ती मुद्देमाल कक्ष) हा असाच एक राज्याच्या पातळीवर पथदर्शक ठरणारा उपक्रम मागील महिन्यामध्ये नवी मुंबई पोलीस आयुक्तालयात सुरू करण्यात आला आहे. पूर्वी पोलीस ठाण्यामध्ये व आवारांमध्ये वेगवेगळ्या गुन्ह्यातील जप्त केलेली अनेक वाहने धूळखात व कुजलेल्या अवस्थेत पडून राहत होती. त्यामुळे पोलीस ठाण्याचा परिसर हा डम्पिंगग्राऊंड सारखा झाला होता. ही सर्व वाहने पोलीस आयुक्तांनी सुरू केलेल्या ईएमसी या नवीन उपक्रमामुळे तळोजा येथे एकत्रित ठेवण्यात आली आहेत. त्यामुळे सर्व पोलीस ठाणे परिसर आता मोकळा झाला आहे.

सीबीडी बेलापूर पोलीस ठाण्याच्या आवारामध्ये सुद्धा अनेक वर्षांपासून बरीच वाहने धूळखात पडून होती. ती वाहने इएमसी तळोजा येथे जमा केल्यानंतर पोलीस ठाणे आवारातील जागा रिकामी झाली. या रिकाम्या झालेल्या जागेचा सदुपयोग करावा या हेतूने वरिष्ठ पोलीस निरीक्षक गिरीधर गोरे यांनी सीबीडी पोलीस ठाण्याच्या आवारामध्ये पोलीस अधिकारी कर्मचारी यांच्यासाठी ओपन जिम सुरू करून सदर जागेचा सदुपयोग केलेला आहे. सदर ओपन जिमसाठी नवी मुंबई महानगरपालिकेचे सहकार्य लाभले आहे. काही दिवसांपूर्वी गिरीधर गोरे यांनी पोलीस अधिकारी व कर्मचारी यांच्यासाठी बॅडमिंटन कोर्ट बनवले आहे.

सदर ओपन जिमचे उद्घाटन पोलीस आयुक्त मिलिंद भारंबे यांच्या हस्ते संपन्न झाले. यावेळी सह आयुक्त संजय येनपुरे, पोलीस उपायुक्त पंकज डहाणे, तिरुपती काकडे, सहाय्यक पोलीस आयुक्त राहुल गायकवाड, योगेश गावडे यांच्यासह इतर अनेक वरिष्ठ पोलीस अधिकारी उपस्थित होते. सीबीडी पोलीस ठाण्याच्या आवारात सुरू करण्यात आलेल्या ओपन जिम व बॅडमिंटन कोर्ट या उपक्रमाचे पोलीस आयुक्त मिलिंद भारंबे यांनी कौतुक केले.

पोलिसांमधील तणाव कमी होण्यास मदत

पोलिसांच्या २४ तास कर्तव्यामुळे त्यांच्या आरोग्याची हेळसांड होते. इच्छा असूनही पोलिसांना वेळेअभावी व्यायामाकडे वळणे कठीण होते, त्यातूनच पोलिसांमध्ये तणाव निर्माण होत आहे. सततच्या कामाच्या तणावांमध्ये पोलिसांचे मानसिक आरोग्याचाही प्रश्न उपस्थित होत आहे. अशावेळी पोलिसांना कामाच्या ठिकाणीच मिळालेल्या थोड्या वेळाचा सदुपयोग करून स्वतःच्या आरोग्याची काळजी घेता यावी, या उद्देशाने सुरू करण्यात आलेल्या ओपन जिम या संकल्पनेचे पोलीस अधिकारी व कर्मचाऱ्यांमधून स्वागत होत आहे. तसेच तणाव मुक्त होण्यासाठी खेळ खेळणे हे उत्तम साधन असल्याने पोलीस अधिकार व कर्मचाऱ्यांसाठी सुरू करण्यात आलेले बॅडमिंटन कोर्टमुळेही पोलिसांमधील तणाव कमी होण्यास मदत होत आहे.

Related Stories

No stories found.
logo
marathi.freepressjournal.in