

नवी मुंबई : १५ जानेवारी रोजी होणाऱ्या पनवेल महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर कळंबोलीतील प्रभाग क्रमांक ७, ८, ९ व १० मध्ये आयोजित करण्यात आलेल्या ‘लाडकी बहिण’ मेळाव्यातून आदर्श आचारसंहितेचा भंग झाल्याचा गंभीर प्रकार उघडकीस आला आहे. या प्रकरणी सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी भारतीय जनता पार्टीच्या (महायुती) चार उमेदवारांविरोधात कळंबोली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे.
आचारसंहिता भंग केल्याचा आरोप असलेल्या भाजपच्या उमेदवारांमध्ये अमर अरुण पाटील, प्रमिला रविनाथ पाटील, मनाली अमर ठाकूर आणि राजेंद्र शर्मा यांचा समावेश आहे. संबंधित चारही उमेदवारांनी दि. १२ जानेवारी रोजी सायंकाळी ५ ते रात्री ९ या वेळेत कळंबोली सेक्टर-१६, रोडपाली येथील नवीन बस डेपो परिसरात ‘लाडकी बहिण’ मेळावा, हळदी-कुंकू तसेच लकी ड्रॉ कार्यक्रमाचे आयोजन केले होते.
या कार्यक्रमादरम्यान उपस्थित महिलांना लकी ड्रॉच्या माध्यमातून पैठणी साडी देण्याचे प्रलोभन दाखवून मतदान करण्याचे आवाहन करण्यात आल्याचा ठपका ठेवण्यात आला आहे. हा प्रकार थेट मतदारांवर प्रभाव टाकणारा असून, तो आदर्श आचारसंहितेचा स्पष्ट भंग असल्याचे निवडणूक यंत्रणेचे म्हणणे आहे.
या संदर्भात प्रभाग क्रमांक ७, ८, ९ व १० चे सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी विनय शिपाई (३९) यांनी कळंबोली पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. त्यानुसार चारही उमेदवारांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.