

पनवेल : राष्ट्रीय विज्ञान बाल परिषदेच्या जिल्हा पात्रता फेरीत सहभागी होऊन खालापूर येथे परतणाऱ्या शाळेच्या बसची ट्रेलरला पाठीमागून जोरदार धडक बसल्याने नऊ जण जखमी झाले. यामध्ये सहा विद्यार्थी आणि तीन शिक्षकांचा समावेश आहे. हा अपघात मंगळवारी दुपारी कळंबोली-डी-पॉईंट मार्गावरील पुलाजवळ घडला. याप्रकरणी पनवेल शहर पोलिसांनी बसचालकाविरोधात गुन्हा दाखल केला आहे.
कामोठे येथील दि. बा. पाटील स्कूलमध्ये मंगळवारी राष्ट्रीय विज्ञान बाल परिषदेची जिल्हा पात्रता फेरी आयोजित करण्यात आली होती. यामध्ये खालापूर तालुक्यातील लोधीवली येथील रिलायन्स फाऊंडेशन स्कूलचे १३ विद्यार्थी सहभागी झाले होते.
स्पर्धा संपल्यानंतर विद्यार्थी आणि चार शिक्षक खासगी बसने खालापूरला परतत होते. दुपारी सव्वातीनच्या सुमारास कळंबोली-डी-पॉईंट पुलाजवळ बस आली असता चालकाने सुरक्षित अंतर न राखता भरधाव आणि निष्काळजीपणे बस चालविल्याने ती पुढे जाणाऱ्या अशोक लेलँड ट्रेलरवर धडकली. या अपघातात सहा विद्यार्थी आणि तीन शिक्षक जखमी झाले. घटनेची माहिती मिळताच पनवेल शहर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत जखमींना उपचारासाठी रुग्णालयात पाठविले. बसचालकाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक अनंत परागे करीत आहेत.