नवी मुंबई : पनवेल तालुक्यातील औद्योगिक जमिनींच्या गैरव्यवहारात गंभीर अनियमितता आढळल्याने पनवेलचे तहसीलदार विजय पाटील यांना तात्काळ प्रभावाने निलंबित करण्यात आले आहे. राज्यपालांच्या आदेशानुसार महसूल व वन विभागाने हा आदेश ५ सप्टेंबर रोजी काढला.
मे. मेरेथॉन पनवेल इन्फ्रास्ट्रक्चर प्रा. लि. या कंपनीने सन २००७ मध्ये वारदोली, पोयंजे, भिंगारवाडी, भिंगार, पाली बुद्रुक आणि भेरले या गावांतील जमिनी औद्योगिक उद्देशासाठी खरेदी केल्या होत्या. महाराष्ट्र कुळवहिवाट व शेतजमीन अधिनियम, १९४८ च्या कलम ६३ (१ अ) नुसार आवश्यक ती कारवाई करणे अपेक्षित असताना तहसीलदार विजय पाटील यांनी जाणीवपूर्वक दुर्लक्ष केले. परिणामी या जमिनींना अकृषिक सनद देण्यात गंभीर अनियमितता झाल्याचे शासनाच्या निदर्शनास आले.
ही कृती महाराष्ट्र नागरी सेवा (वर्तणूक) नियम, १९७९ मधील नियम ३ चे उल्लंघन करणारी असल्याचे स्पष्ट झाले आहे. त्यामुळे त्यांच्या विरोधात विभागीय चौकशी सुरु ठेवत त्यांना निलंबित करण्यात आले आहे.
निलंबनाच्या कालावधीत विजय पाटील यांचे मुख्यालय रायगड जिल्हाधिकारी कार्यालयात निश्चित करण्यात आले आहे. जिल्हाधिकाऱ्यांच्या परवानगीशिवाय त्यांनी मुख्यालय सोडू नये, असे आदेश आहेत. तसेच निलंबनाच्या काळात त्यांना नियमांनुसार निर्वाह भत्ता आणि पूरक भत्ते मिळणार आहेत.