नवी मुंबई : पनवेलमधील नेरे भागात राहणाऱ्या एका महिलेला दोन वेगवेगळ्या सायबर टोळ्यांनी शेअर मार्केटमधील गुंतवणुकीत भरपूर नफ्याचे आमिष दाखवून तिच्याकडून तब्बल २० लाख ५० हजार रुपये उकळून तिची फसवणूक केल्याचे उघडकीस आले आहे. पनवेल तालुका पोलिसांनी या प्रकरणात सहभागी असलेल्या दोन वेगवेगळ्या सायबर टोळ्यांविरोधात फसवणुकीसह आयटी ॲक्टनुसार गुन्हा दाखल करून त्यांचा शोध सुरू केला आहे.
या प्रकरणात फसवणूक झालेली ३४ वर्षीय महिला पनवेलच्या कोप्रोली भागात राहण्यास असून ती एका कंपनीवर डायरेक्टर म्हणून कार्यरत आहे. या महिलेला शेअर मार्केटचे चांगले ज्ञान असल्याने ती शेअर मार्केटमध्ये पैसे गुंतवणूक करीत होती. गत फेब्रुवारी महिन्यांमध्ये या महिलेच्या फेसबूक अकाऊंटवर सायबर टोळ्यांनी फसवणूक करण्यासाठी तयार केलेली जाहिरात निदर्शनास आली होती. सदर जाहिरातीत शेअर मार्केटमध्ये कमी गुंतवणुकीमध्ये जास्त परतावा मिळण्याबाबतची माहिती देण्यात आल्याने या महिलेने सदर जाहिरातीत दिलेल्या लिंकवर क्लिक केले असता, सदर महिला एका व्हॉट्सॲप ग्रुपमध्ये जोडली गेली.
त्यानंतर सायबर टोळीने या महिलेच्या मोबाईल क्रमांकाचे व आधारकार्डचे व्हेरिफिकेशन करण्याचा बहाणा करून या महिलेला गुंतवणूक करण्यास सांगण्यात आले. त्यानंतर या महिलेने ५० हजार रुपये गुंतवणूक केल्यानंतर या महिलेने सदर कंपनीबाबत खात्री करण्यासाठी ५० हजाराची रक्कम परत काढून घेतली. त्यानंतर सदर रक्कम या महिलेच्या खात्यात जमा झाल्याने या महिलेचा अपोलो अकॅडमी या कंपनीवर विश्वास बसला. त्यानंतर या महिलेने सदर कंपनीत एकूण ६ लाख ५० हजाराची गुंतवणूक केली. त्यानंतर या महिलेने सदर रक्कम काढण्याचा प्रयत्न केला, मात्र तिला सदर रक्कम काढता आली नाही. त्यानंतर सदर महिलेला इन्स्टिट्यूशनस बुल्स नावाच्या दुसऱ्या व्हाॅट्सॲप ग्रुपमध्ये जोडून त्यांना गुंतवणूक करण्यास सांगण्यात आले. तसेच या महिलेकडून १४ लाख रुपये उकळण्यात आले. याप्रसंगी या महिलेने पनवेल तालुका पोलीस ठाण्यात धाव घेऊन तक्रार दाखल केली.