रेलिंग ओलांडून प्रवाशांचा जीवघेणा प्रवास सुरूच, प्रवाशांकडून पादचारी पूल, सरकते जिने यांचा वापर नाहीच

प्रवाशांनी रेल्वे रुळ ओलांडू नये यासाठी रेल्वे प्रशासनाने फ्लॅटफॉर्मच्या दोन्ही बाजूकडील रॅम्प तोडुन त्याठिकाणी लोखंडी रेलिंग बसविल्यानंतर देखील बहुतेक प्रवाशांचा रेलिंग ओलांडून रेल्वे रुळांवरून प्रवास सुरू असल्याचे निदर्शनास आले आहे.
रेलिंग ओलांडून प्रवाशांचा जीवघेणा प्रवास सुरूच, प्रवाशांकडून पादचारी पूल, सरकते जिने यांचा वापर नाहीच
Published on

नवी मुंबई : प्रवाशांनी रेल्वे रुळ ओलांडू नये यासाठी रेल्वे प्रशासनाने फ्लॅटफॉर्मच्या दोन्ही बाजूकडील रॅम्प तोडुन त्याठिकाणी लोखंडी रेलिंग बसविल्यानंतर देखील बहुतेक प्रवाशांचा रेलिंग ओलांडून रेल्वे रुळांवरून प्रवास सुरू असल्याचे निदर्शनास आले आहे. त्यामुळे रेल्वे रुळ ओलांडणाऱ्या या प्रवाशांना आवारायचे कसे? असा प्रश्न रेल्वे प्रशासनाला पडला आहे.

प्रवाशांची रेल्वे रूळ ओलांडून फलाटावर जाण्याची सवय मोडावी तसेच त्यांनी रेल्वे स्थानकातील पादचारी पूलाचा वापर करावा, यासाठी रेल्वे प्रशासनाकडून रेल्वे स्थानकात सर्वतोपरी सुविधा उपलब्ध करून देण्यात येत आहेत. मध्य रेल्वेने प्रवाशांच्या सुरक्षेसाठी मध्य व हार्बर रेल्वे मार्गावरील बहुतेक रेल्वे स्थानकाच्या दोन्ही टोकाला असलेले रॅम्प तोडून त्याजागी लोखंडी रेलिंग बसविले आहेत; मात्र त्यानंतर देखील शॉर्टकट मारण्याच्या व वेळ वाचवण्याचा नादात अनेक प्रवासी आपला जीव धोक्यात घालुन रेल्वे रुळ ओलांडून जात असल्याचे निदर्शनास आले आहे.

गत नोव्हेंबर महिन्यात रेल्वे स्थानकावरील रॅम्प तोडुन त्याजागी रेलिंग बसवण्यास कामाला सुरुवात झाली आहे. मात्र त्यानंतर देखील प्रवाशांचा बेजबाबदारपणा सुरू असून, हार्बर रेल्वे मार्गावरील बहुतेक रेल्वे स्थानकात प्रवाशांकडून रेल्वे रुळ ओलांडण्याचे प्रकार सर्रास सुरू आहेत. हे प्रवासी आता लोखंडी रेलिंग सुद्धा ओलांडून रेल्वे रुळावरून ये-जा करत असल्याचे निदर्शनास येत आहे.

ग्रीस लावून प्रवाशांना अटकाव करण्याचा प्रयत्न

रेल्वे स्थानकाच्या दोन्ही टोकाला असलेले रेलींग ओलांडून ये-जा करणाऱ्या प्रवाशांना रोखण्यासाठी रेल्वे प्रशासनाने रेलींगच्या बाजुला फलाटावर मोठ्या प्रमाणात ग्रीस पसरवून ठेवण्यास सुरुवात केली आहे. जेणेकरुन या ठिकाणावरुन जाणाऱया प्रवाशांच्या चफ्पल, बुट व कपड्यांना ग्रीस लागण्याची भिती असल्याने प्रवासी रेलींग ओलांडुन जाणार नाहीत. मात्र अनेक प्रवासी त्याची तमा न बाळगता रेलींग ओलांडून जात असल्याचे निदर्शनास येत आहे.

रेल्वे पोलिसांची कारवाई थंडावली

रेल्वे रुळ ओलांडताना प्रवासी आढळल्यास त्यांच्यावर कारवाई करत त्यांचे समुपदेशन करण्याचे काम रेल्वे पोलिसांद्वारे करण्यात येते; मात्र गेल्या काही दिवसांपासून ही कारवाई थंडावल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे प्रवाशांकडून रेल्वे रुळ ओलांडून शॉर्टकट मारण्याचे प्रकार सुरू आहेत. एका रेल्वे स्थानकात आरपीएफ, जीआरपी, एमएसएफ जवान असे फक्त ३ ते ४ कर्मचारी असतात, एवढ्या अल्प मनुष्यबळात सर्व ठिकाणी लक्ष देणे त्रासदायक आणि आव्हानात्मक असल्याचे रेल्वे पोलिस कर्मचाऱयांचे म्हणणे आहे.

logo
marathi.freepressjournal.in