नवी मुंबईत ५० मजली टॉवर्स उभारणीचा झाला मार्ग मोकळा; एनओसी देण्यास एएआयने मान्यता

सध्या एअरपोर्ट सर्व्हेलन्स रडारची जागा डीपीएस नेरूळहून ढकाळे आयलंडला बदलण्यास एएआयने मान्यता दिली
नवी मुंबईत ५० मजली टॉवर्स उभारणीचा झाला मार्ग मोकळा; एनओसी देण्यास एएआयने मान्यता

नवी मुंबईत आंतरराष्ट्रीय विमानतळाची उभारणी सुरू आहे. या विमानतळाजवळच्या इमारतींना उंचीचे बंधन असल्याने आतापर्यंत शहरात उंचच उंच टॉवर उभे राहत नव्हते. आता भारतीय विमानतळ प्राधिकरणाने (एएआय) उंचीची अट शिथील केल्याने नवी मुंबईत ५० मजली टॉवर्स उभारणीचा मार्ग मोकळा झाला आहे. प्रस्तावित विमानतळाच्या २० किलोमीटर परिसरातील इमारतींना उंचीबाबतची ‘एनओसी’ देण्यास एएआयने मान्यता दिली आहे. या निर्णयामुळे विकासकांमध्ये आनंदाचे वातावरण पसरले असून शहरात आता ५० मजल्यांच्या इमारती उभारल्या जाऊ शकतात.

सध्या एअरपोर्ट सर्व्हेलन्स रडारची जागा डीपीएस नेरूळहून ढकाळे आयलंडला बदलण्यास एएआयने मान्यता दिली. या निर्णयामुळे २०१८ पासून इमारतीच्या उंचीवर असलेले निर्बंध शिथील होणार आहेत. याबाबतचा निर्णय २२ जुलै २०२२ रोजी झालेल्या संयुक्त बैठकीत घेण्यात आला. यात नागरी विमान वाहतूक खात्याचे अधिकारी, एएआय, सिडको, नवी मुंबई विमानतळाचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते. ऑगस्ट २०२२ च्या पहिल्या आठवड्यापासून एएआय ‘एनओसी’ प्रमाणपत्र वाटप करण्यास प्रारंभ करेल. ५५.१ मीटर उंचीपेक्षा अधिक बांधकाम करणाऱ्यांनी अर्ज करायचा आहे. नवी मुंबई बिल्डर्स असोसिएशन ऑफ नवी मुंबईचे अध्यक्ष हरेष छेडा म्हणाले की, गेल्या अनेक वर्षांपासून शहरातील बिल्डर ही मागणी करत होते. आता मुंबईप्रमाणेच नवी मुंबईतही उंचच उंच इमारत दिसू लागतील.

Related Stories

No stories found.
logo
marathi.freepressjournal.in