पेण नगरपरिषदेच्या तिजोरीत तब्बल पावणेतेरा कोटींची भर; २०२५-२०२६ या आर्थिक वर्षात रेकॉर्डब्रेक करवसुली

पेण नगरपालिकेने २०२५-२०२६ या आर्थिक वर्षात करवसुलीत उल्लेखनीय कामगिरी करत पालिका तिजोरीत तब्बल १२ कोटी ८९ लाख ५९ हजार ८० रुपयांची भर घातली आहे.
पेण नगरपरिषदेच्या तिजोरीत तब्बल पावणेतेरा कोटींची भर; २०२५-२०२६ या आर्थिक वर्षात रेकॉर्डब्रेक करवसुली
पेण नगरपरिषदेच्या तिजोरीत तब्बल पावणेतेरा कोटींची भर; २०२५-२०२६ या आर्थिक वर्षात रेकॉर्डब्रेक करवसुलीसंग्रहित छायाचित्र
Published on

पेण : पेण नगरपालिकेने २०२५-२०२६ या आर्थिक वर्षात करवसुलीत उल्लेखनीय कामगिरी करत पालिका तिजोरीत तब्बल १२ कोटी ८९ लाख ५९ हजार ८० रुपयांची भर घातली आहे. मालमत्ता कराच्या १३ कोटी २५ लाखांच्या उद्दिष्टापैकी ११ कोटी २३ लाख (८५ टक्के) वसुली ३१ मार्चअखेर पूर्ण करण्यात आली आहे. तर पाणीपट्टीतून १ कोटी ६६ लाख ५९ हजार ८० रुपये (८०.५३ टक्के) वसुली करण्यात आली.

मालमत्ता कर आणि पाणीपट्टी या दोन्ही प्रमुख उत्पन्न स्रोतांमध्ये मिळून झालेल्या या विक्रमी वसुलीमुळे पालिकेच्या आर्थिक स्थितीत मोठी सुधारणा झाल्याचे दिसून येत आहे. मुख्याधिकारी जीवन पाटील यांनी या यशाबद्दल अधिकारी व कर्मचाऱ्यांचे कौतुक करत अभिनंदन केले.

पालिकेच्या १२ प्रभागांमध्ये गेल्या वर्षी सप्टेंबरपासून ते मार्चअखेरपर्यंत सातत्याने जनजागृती आणि वसुली मोहीम राबविण्यात आली. नागरिकांना मालमत्ता कर भरण्यासाठी विविध सुविधा उपलब्ध करून देण्यात आल्या. जाहीर दवंडी, आवाहन मोहीम आणि सुट्टीच्या दिवशीही कार्यालय सुरू ठेवत कर्मचाऱ्यांनी कामकाज केले. त्यामुळे पालिकेचे आर्थिक नुकसान टाळण्यात यश आले.

तसेच, नागरिकांच्या हरकती व सूचनांची दखल घेत बिलांमध्ये आवश्यक त्या सुधारणा करण्याची भूमिका प्रशासनाने घेतली. त्यामुळे नागरिकांचा विश्वास वाढला आणि महसूल वसुलीतही सकारात्मक प्रतिसाद मिळाला.

संजय पाटील, महेंद्र गाडेकर, मधुकर ठाकूर, संदीप पाटील, प्रवीण बैकर, विलास लिमये, दीपक हजारे, विवेक सावंत, शिवानी नाक्ते, दर्शना ठाकूर, जोत्स्ना पाटील, सुरेखा गुरव, पायल पाटील, यश बांदिवडेकर, ओंकार लोखंडे आदी कर्मचाऱ्यांनी वसुली मोहिमेत सक्रिय सहभाग नोंदवला.

मालमत्ताकर विभागाचे कर निरीक्षक गोविंद भिसे आणि वसुली विभागप्रमुख महेश वडके यांच्या नियंत्रणाखाली ११ कोटी २३ लाखांची वसुली झाली. तर पाणीपुरवठा विभागाचे रमेश देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली १ कोटी ६६ लाख ५९ हजार रुपयांची पाणीपट्टी वसुली करण्यात आली.

ही कामगिरी पूर्णपणे अधिकारी आणि कर्मचाऱ्यांच्या मेहनतीचे फळ आहे. रायगड जिल्ह्यातील इतर नगरपालिकांच्या तुलनेत पेण नगरपालिकेने करवसुलीत अव्वल स्थान पटकावले आहे.

जीवन पाटील, मुख्याधिकारी

अधिकारी व कर्मचाऱ्यांची दमदार कामगिरी

अपुरा कर्मचारी वर्ग, निवडणुकीची कामे आदी अडचणी असतानाही मुख्याधिकारी जीवन पाटील यांच्या नेतृत्वाखाली ही मोहीम यशस्वीपणे पार पडली. लेखापाल किरण शहा, कर निरीक्षक गोविंद भिसे, वसुली विभागप्रमुख महेश वडके, संगणक अभियंता निकिता पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली गटप्रमुख व कर्मचाऱ्यांनी समन्वयाने काम केले.

logo
marathi.freepressjournal.in