पेणकरांच्या हक्काचे पाणी नवी मुंबईच्या घशात; लोकप्रतिनिधींचे दुर्लक्ष, बेलवडे, जिते येथे जमिनीखालून खोदकाम

पेण तालुक्यातील हेटवणे धरण हे रायगड जिल्ह्यासाठी आहे की फक्त नवी मुंबईसाठी? असा प्रश्न पेणकरांना पडू लागला आहे.
पेणकरांच्या हक्काचे पाणी नवी मुंबईच्या घशात; लोकप्रतिनिधींचे दुर्लक्ष, बेलवडे, जिते येथे जमिनीखालून खोदकाम
Published on

अरविंद गुरव/पेण

पेण तालुक्यातील हेटवणे धरण हे रायगड जिल्ह्यासाठी आहे की फक्त नवी मुंबईसाठी? असा प्रश्न पेणकरांना पडू लागला आहे. कारण वर्षातील आठ महिने पाणीटंचाई सहन करणाऱ्या पेण तालुक्यातील आदिवासी वाड्या, पाडे आणि खारेपाट विभाग आजही हक्काच्या पाण्यासाठी संघर्ष करत आहेत. परंतु दुसरीकडे हेटवणे धरणाचे पाणी नवी मुंबईला वळवण्याचा डाव शासनाने आखल्याचे चित्र पहावयास मिळत आहे.

या योजनेसाठी मागील दोन वर्षांपासून जमिनीखाली टनेल बोअरिंग मशीनच्या सहाय्याने १०५ मीटर खोलीवर पाईपलाइन टाकण्याचे काम सुरू आहे. हे काम अत्यंत सावधगिरीने आणि छुप्या पद्धतीने सुरू असून, सिडकोमार्फत मेघा इंजिनिअरिंग, व्ही-टेक आणि एफकॉन या कंपन्यांना हे काम देण्यात आले आहे. विशेष म्हणजे ज्या शेतकऱ्यांच्या शेतीखालून पाईपलाइन जात आहे, त्यांना याची कोणतीही अधिकृत कल्पना देण्यात आलेली नाही. हेटवणे धरण ते जिते या १३ किलोमीटर पाईपलाइनसाठी बेलवडे आणि जिते येथे १०० मीटर खोल व १२ मीटर रुंद अशा दोन मोठ्या विहिरी खोदण्यात आल्या आहेत. तिसरे विहीर हेटवणे धरण परिसरापासून ३०० मीटर अंतरावर प्रस्तावित आहे. या पहिल्या टप्प्यातील पाइपलाइन आणि जलशुद्धीकरण केंद्रासाठी तब्बल १०४२ कोटी रुपयांच्या निविदा निघाल्या आहेत.

दुसऱ्या टप्प्यात जिते ते वहाळ (१५ किलोमीटर) पाइपलाइनसाठी आणखी १२०० कोटींचा खर्च अपेक्षित असल्याचे सिडकोचे उपअभियंता राजेंद्र पोतदार यांनी सांगितले. एकीकडे सरकार व प्रशासन नवी मुंबईकरांना पाणी देण्यासाठी सुमारे २२०० कोटी रुपयांची तातडी दाखवत आहे, तर पेण तालुक्यातील खारेपाट विभागातील नागरिक वर्षानुवर्षे पिण्याच्या पाण्यासाठी झगडत आहेत. मात्र स्थानिक लोकप्रतिनिधी आणि नेते मंडळी फक्त उन्हाळ्यातील पाणीटंचाईवर राजकीय भांडवल करण्यापुरतीच मर्यादित राहिल्याची संतप्त प्रतिक्रिया नागरिकांकडून व्यक्त केली जात आहे.

हेटवणे धरणाचे पाणी पेणच्या खारेपाट विभागाला मिळण्यासाठी वर्क ऑर्डर निघणे आवश्यक आहे. तरीसुद्धा सिडकोसाठी एवढी घाई का? २०१८ च्या धरण बचाव कायद्यानुसार धरण क्षेत्रापासून २०० मीटर अंतरावर खोदकाम करता येत नाही, तरीही हे काम सुरू आहे. हे कायद्याचे उल्लंघन आहे.

- नंदा म्हात्रे, सामाजिक कार्यकर्त्या, पेण

हेटवणे ते जिते पाईपलाइनसाठी बेलवडे येथील सर्वे नंबर २३८ मधील उत्खननासाठी शासनाची रॉयल्टी भरली आहे. सुमारे २ हजार ब्रास उत्खनन झाले असून, त्यावर चार टप्प्यांमध्ये १२ लाख रुपये महसूल जमा झाला आहे. पुढील रॉयल्टी वसुलीची प्रक्रिया सुरू आहे.

- नरेश पवार, वरिष्ठ लिपिक, पेण

logo
marathi.freepressjournal.in