पेण अर्बनच्या खातेदारांना दिवाळी भेट; खातेदारांना ठेवींच्या १० टक्के रक्कम मिळणार, उच्च न्यायालयाचा निकाल

पेण को-ऑपरेटिव्ह अर्बन बँकेतील खातेदारांची दिवाळी यंदा गोड होणार आहे. कारण...
पेण अर्बनच्या खातेदारांना दिवाळी भेट; खातेदारांना ठेवींच्या १० टक्के रक्कम मिळणार, उच्च न्यायालयाचा निकाल
पेण अर्बनच्या खातेदारांना दिवाळी भेट; खातेदारांना ठेवींच्या १० टक्के रक्कम मिळणार, उच्च न्यायालयाचा निकाल
Published on: 

कर्जत: पेण को-ऑपरेटिव्ह अर्बन बँकेतील खातेदारांची दिवाळी यंदा गोड होणार आहे. कारण, बँकेच्या खातेदारांच्या ठेवींच्या १० टक्के अथवा कमाल १ लाख रुपयांच्या मयदित रक्कम वितरित करण्याचे निर्देश मुंबई उच्च न्यायालयाने दिल्याची माहिती पेण अर्बन बँक ठेवीदार व खातेदार संघर्ष समितीचे कार्यवाह आणि विशेष कृती समिती सदस्य नरेन जाधव यांनी दिली.

मुंबई उच्च न्यायालयाचे न्या. सुमन शाम आणि न्या. गौतम अनखड यांच्या खंडपीठाने 'डिपॉझिट इन्शुरन्स अँड क्रेडिट गॅरंटी कॉर्पोरेशन'चा (डीआयसीजीसी) आक्षेप फेटाळून लावला. या निकालामुळे बँकेतील ४२ हजार ४८२ मध्यम व मोठ्या ठेवीदारांना मोठा दिलासा मिळणार आहे.

ठेवीदारांना रक्कम देण्यास डीआयसीजीसीने आक्षेप घेतला होता. मात्र, पेण अर्बन बँक ठेवीदार खातेदार संघर्ष समितीचे कार्यवाह नरेन जाधव यांनी दाखल केलेल्या याचिकेवर सुनावणी करताना उच्च न्यायालयाच्या खंडपीठाने हा आक्षेप फेटाळला.

यापूर्वी बँकेतील १ लाख १५ हजार छोट्या ठेवीदारांना २६.९४ कोटी रुपयांची परतफेड झाली आहे. त्यानंतर आता मध्यम व मोठ्या खातेदारांच्या परताव्याचा मार्ग मोकळा झाला आहे.

बँकेच्या अधिकृत वर्गवारीनुसार, २५ हजार रुपयांपेक्षा जास्त ठेव असणाऱ्या ४२,४८२ ठेवीदारांची एकूण ठेव रक्कम ५८३ कोटी ८५ लाख १० हजार ९४७ रुपये आहे. उच्च न्यायालयाच्या निकालानुसार प्रत्येकाला त्याच्या ठेवीच्या १० टक्के रक्कम किंवा जास्तीत जास्त १ लाख रुपये देण्याचे निश्चित केले. या न्यायालयीन सूत्रानुसार प्रत्यक्ष हिशोब केला असता, या सर्व खातेदारांना मिळून एकूण ५३ कोटी ८ लाख ७३ हजार रुपयांचे थेट वाटप होईल.

दहा लाखांपेक्षा अधिक रक्कम असणाऱ्या ३९९ बड्या खातेदारांची एकूण ठेव सुमारे २२ कोटी ८७ लाख रुपये आहे. या ठेवीदारांचे १० टक्के हे १ लाखांपेक्षा अधिक होत असले तरी, न्यायालयाच्या कमाल मर्यादच्या निकषामुळे या ३९९ ठेवीदारांना प्रत्येकी १ लाख रुपयांप्रमाणे एकूण ३ कोटी २९ लाख रुपयांचे वितरण केले जाईल.

गेल्या १५ वर्षांहून अधिक काळ आर्थिक विवंचनेत काढणाऱ्या सामान्य ठेवीदारांमध्ये या ऐतिहासिक निकालामुळे समाधानाचे वातावरण पसरले आहे. न्यायालयीन अडथळे दूर झाल्याने आता ही परतावा रक्कम प्रशासनाकडून लवकरात लवकर ठेवीदारांच्या बँक खात्यात जमा केली जावी, अशी मागणी सर्वसामान्य खातेदारांमधून केली जात आहे.

बँकेच्या ताब्यातील १५० मालमत्तांची विक्री झाल्यास १,००० कोटी रुपयांपेक्षा अधिक रक्कम वसूल होऊ शकते. त्यातून १ लाख ३१ हजार ९७६ या सर्व ठेवीदारांचे पैसे सव्याज परत करणे शक्य असल्याचे नरेन जाधव यांनी सांगितले. सध्या कर्जवसुलीतून काही रक्कम जमा झाली असून, एकूण १५० मालमत्तांपैकी १२ मालमत्तांच्या मूल्यांकनाचे काम हाती घेतले आहे. मात्र, विक्रीच्या प्रक्रियेत काही कायदेशीर हरकती आणि अडचणी निर्माण करत असल्याचे त्यांनी सांगितले.

अन्य बँकेत विलीनीकरणाचे प्रयत्न

पेण नगरपालिकेच्या जवळील १३ हेक्टर जमीन तसेच 'नैना' प्रकल्प परिसरातील मोक्याच्या जमिनी आदींचा बँकेच्या मालमतांमध्ये समाविष्ट आहेत. अन्य मालमत्ता बँकेच्या ताब्यात असून त्यांची विक्री करता येऊ शकते. पण हे काम गुंतागुंतीचे आहे. त्यामुळे बँकेचे दुसऱ्या सक्षम बँकेत विलीनीकरण करून या सर्व मालमता त्या बँकेच्या स्वाधीन केल्यास वसुली आणि ठेवीदारांचे पैसे देण्याची प्रक्रिया अधिक सुलभ होऊ शकते. या विलीनीकरणासाठी प्रयत्न सुरू असल्याचे जाधव यांनी स्पष्ट केले.

(संबंधित इंग्रजी बातमी वाचण्यासाठी येथे क्लिक करा.)