पोलीस निरीक्षकाने व्यावसायिकाला लुटले!

विद्याविहार पाइपलाईन रोडवर राहणारे राजेश काटरा यांचे तुर्भे एमआयडीसीमध्ये कोल्ड स्टोअरेज आहे. दुपारी नेहमीप्रमाणे नवी मुंबईच्या दिशेने निघाले. दोनच्या सुमारास त्यांची कार सायन-पनवेल मार्गावरील वाशी उड्डाणपुलाखाली आली.
पोलीस निरीक्षकाने व्यावसायिकाला लुटले!

नवी मुंबई : मुंबई पोलीस दलातील पोलीस असल्याची बतावणी करून घाटकोपर येथील व्यावसायिकाकडून दोन कोटींची खंडणी उकळण्याचा कारनामा ठाणे ग्रामीण पोलीस दलातील पोलीस निरीक्षक नितीन विजयकर आणि त्याच्या पाच सहकाऱ्यांनी केला आहे. या व्यावसायिकाची कार लुटारूंनी पामबीचच्या सर्व्हिस रोडवर अडवली. या व्यावसायिकाला गुन्हा दाखल करण्याची धमकी दिली आणि त्याच्याकडून दोन कोटी रुपयांची खंडणी घेतली. या खंडणीखोर पोलीस निरीक्षकासह सहा आरोपींना वाशी पोलिसांनी सोमवारी अटक केली.

विद्याविहार पाइपलाईन रोडवर राहणारे राजेश काटरा यांचे तुर्भे एमआयडीसीमध्ये कोल्ड स्टोअरेज आहे. दुपारी नेहमीप्रमाणे नवी मुंबईच्या दिशेने निघाले. दोनच्या सुमारास त्यांची कार सायन-पनवेल मार्गावरील वाशी उड्डाणपुलाखाली आली. त्यांची कार पामबीचवर जाण्यासाठी सर्व्हिस रोडवर आली असता लुटारूंनी आपली कार त्यांच्या कारला आडवी लावली. त्यांच्या कारच्या मागेही एक कार उभी करण्यात आली. “तुमच्याकडे पैशांचा मोठा साठा आहे. याबाबत अनेक तक्रारी आहेत. जर केस झाली तर तुम्ही आणि तुमचे सर्वच कुटुंब यात अडकू शकते,” अशी भीती आरोपींनी राजेश यांना दाखवली. हे प्रकरण मिटवण्यासाठी त्यांच्याकडे दोन कोटी रुपयांच्या खंडणीची मागणी केली.

लुटारूंकडून होत असलेल्या दमदाटी मुळे राजेश काटरा घाबरले. त्यांनी या लुटारूंना वाशी येथील सेक्टर २९ मधील आपल्या नातेवाईकांच्या घरी नेले आणि तिथे दोन कोटी रुपये त्यांना दिले. याप्रकरणी वाशी पोलिसांनी पोलीस निरीक्षक नितीन विजयकर, मोहन पाडळे, उदय कवळे, विलास मोहिते, नारायण सावंत आणि मोहन पवार या आरोपींना अटक केली आहे.

logo
marathi.freepressjournal.in