थर्टी फर्स्टसाठी पोलीस सज्ज

थर्टी फर्स्ट आणि नवीन वर्षाचे स्वागतादरम्यान नियम तोडणाऱ्यांवर उल्हासनगर पोलिसांची करडी नजर असणार आहे.
संग्रहित छायाचित्र
संग्रहित छायाचित्र
Published on

उल्हासनगर : थर्टी फर्स्ट आणि नवीन वर्षाचे स्वागतादरम्यान नियम तोडणाऱ्यांवर उल्हासनगर पोलिसांची करडी नजर असणार आहे. उल्हासनगर आणि आजूबाजूच्या परिसरातील 'तळीरामांना' कडक इशारा देत पोलिसांनी मोठ्या बंदोबस्ताची तयारी केली आहे. त्यामुळे थर्टी फर्स्टला दारू पिऊन गाडी चालवताना आढळल्यास त्या वाहनचालकावर कारवाई करण्यात येणार आहे.

उल्हासनगर, अंबरनाथ, बदलापूर आणि विठ्ठलवाडी भागात पोलिसांनी २९ ठिकाणे हॉटस्पॉट म्हणून चिन्हित केली आहेत. या ठिकाणी दारू पिऊन गाडी चालवणे, रस्त्यावर धांगडधिंगा करणे किंवा सार्वजनिक ठिकाणी त्रासदायक वर्तन करणाऱ्यांवर कडक कारवाई केली जाणार आहे.

उरणमध्ये तळीरामांवर करडी नजर

थर्टी फर्स्ट आणि नवीन वर्ष साजरे करताना कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी उरण पोलिसांकडून चोख बंदोबस्त ठेवण्यात येणार आहे. यामध्ये विशेष करून तळीरामांवर पोलिसांची करडी नजर राहणार आहे. दारूच्या दुकानासमोर पोलिसांचा बंदोबस्त ठेवण्यात येणार आहे. विनापरवाना दारू आढळल्यास त्याच्यावर कारवाई करण्यात येणार आहे. थर्टी फर्स्ट साजरा करण्यासाठी मोठ्या प्रमाणात पर्यटक येण्याची शक्यता लक्षात घेऊन उरण पोलिसांनी ही दक्षता घेतली आहे. उरण तालुका हा निसर्गरम्य असून येथे मोठा समुद्रकिनारा आहे, तर पूर्व भागात अनेक ठिकाणी मोठमोठे फार्महाऊस आहेत. नवीन वर्षाचे स्वागत करण्यासाठी येथे मोठ्या प्रमाणात पर्यटक येत असतात.

नवी मुंबईत जनजागृती

नवी मुंबईत थर्टी फर्स्टच्या पार्श्वभूमीवर ड्रंक अँड ड्रॉइव्ह करणारे आणि वाहतूककोंडीस कारणीभूत ठरणाऱ्यांवर तत्काळ कडक कारवाई करण्यात येणार असून गेला आठवडाभर त्यासाठीच जनजागृती करण्यात येत आहे. थर्टी फर्स्ट आणि २०२५ च्या स्वागतानिमित्त हॉटेल, शेतघरे, निसर्गरम्य ठिकाणी सहली, मनोरंजन पार्क अशा ठिकाणी बुकिंग झालेले आहे. यावेळी कोणताही गैरप्रकार होऊ नये यासाठी पोलीस विभाग सज्ज झाला आहे. यासाठी वाहतूक विभाग गेल्या आठ दिवसांपासून कामाला लागला आहे.

रायगडमध्ये विशेष पथक

रायगड जिल्ह्यातील समुद्रकिनारपट्टी असलेली अलिबाग, मांडवा, काशिद, मुरूड, श्रीवर्धन, दिवेआगर ही ठिकाणे, खालापूर व कर्जत तालुक्यातील फार्महाऊस, थंड हवेचे ठिकाण माथेरान येथे नववर्ष स्वागतासाठी मोठ्या प्रमाणात पर्यटक येत असतात. त्यामुळे थर्टी फर्स्टच्या पार्श्वभूमीवर जिल्हा पोलीस दलाकडून चोख पोलीस बंदोबस्त ठेवण्यात येणार आहे. जिल्ह्यातील २८ पोलीस ठाण्यांकडे विशेष पथक तयार करण्यात आले असून हॉटेल, धाबे, कॉटेज, फार्महाऊस येथे गैरकृत्य होणार नाही, याकडे विशेष लक्ष देण्यात येणार आहे.

ढाबे, हॉटेल्स, रिसॉर्ट्सवर पोलिसांची नजर

पोलीस उपायुक्त सचिन गोरे यांच्या मार्गदर्शनाखाली उल्हासनगर, अंबरनाथ, विठ्ठलवाडी आणि बदलापूर शहरांतील प्रमुख चौक, नाके, ढाबे, हॉटेल्स आणि रिसॉर्ट्सवर पोलिसांचा करडा पहारा राहणार आहे. या ठिकाणी 'ब्रिथ ॲनालायझर'चा वापर होणार आहे. नशेचे प्रमाण अधिक आढळल्यास तातडीने गाडी जप्त करून संबंधितावर कठोर कारवाई केली जाणार आहे.

logo
marathi.freepressjournal.in