भाषा टिकवण्याची जबाबदारी शासनासह जनतेचीही -प्रल्हाद जाधव; मराठी भाषा संवर्धन पंधरवडानिमित्त नवी मुंबई महापालिकेमध्ये व्याख्यान संपन्न

मातृभाषा मराठी आपल्या अस्तित्वाचा हुंकार असून मराठी भाषेत ज्ञाननिर्मिती करुन तिचे संवर्धन करायला हवे
भाषा टिकवण्याची जबाबदारी शासनासह जनतेचीही -प्रल्हाद जाधव; मराठी भाषा संवर्धन पंधरवडानिमित्त नवी मुंबई महापालिकेमध्ये व्याख्यान संपन्न

नवी मुंबई : नवी मुंबई महापालिकेच्या वतीने महापालिका आयुक्त राजेश नार्वेकर यांच्या मार्गदर्शनाखाली, मराठी भाषा संवर्धन पंधरवडा निमित्त आयोजित उपक्रमातील दुसरे व्याख्यानपुष्प गुंफताना महाराष्ट्र शासनाचे निवृत्त माहिती संचालक तथा सुप्रसिध्द लेखक, नाटककार प्रल्हाद जाधव यांनी ‘वाणी, भाषा, लेखणी...शासकीय कामकाजातील यशाची त्रिवेणी' या विषयावर उपस्थित महापालिा अधिकारी, कर्मचारी यांच्याशी संवाद साधला.

मराठी भाषेच्या कामकाजातील वापराविषयी महत्वाच्या असलेल्या या व्याख्यानप्रसंगी समाजविकास विभागाचे उपायुक्त किसनराव पलांडे, उपायुक्त मंगला माळवे, महापालिका सचिव चित्रा बाविस्कर, शिक्षणाधिकारी अरुणा यादव, विधी अधिकारी अभय जाधव तसेच अधिकारी, कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

मातृभाषा मराठी आपल्या अस्तित्वाचा हुंकार असून मराठी भाषेत ज्ञाननिर्मिती करुन तिचे संवर्धन करायला हवे. असे सांगत साहित्यिक, वक्ते प्रल्हाद जाधव यांनी भाषा टिकवण्याची जबाबदारी शासकीय यंत्रणेवर टाकली जाते. मात्र, ती जनतेचीही जबाबदारी असून दोघांनी एकत्रितपणे आणि त्यात शासनाने समन्वयकाच्या भूमिकेतून भाषा संवर्धनाचे काम केले पाहिजे, असे मत साहित्यिक-ववते प्रल्हाद जाधव यांनी व्यक्त केले.

महापालिका शब्दात पालक नाही तर पालिका आहे. म्हणजेच तिच्यात स्त्रित्वाची, आईपणाची भावना आहे. आईपण जपणारे असते. त्यात नवी मुंबई देखील स्त्रीलिंगी शब्द असल्याने त्यातही आईपण आहे. त्यामुळे दोन आया एकत्र येऊन शहर संगोपनाची भूमिका त्या चांगल्या रितीने जपत असल्याचे गौरवोद्‌गार जाधव यांनी यावेळी काढले.

आपली भाषा सर्वांना सामावून घेणारी असल्याने इतर भाषेतील अनेक शब्द आपण सहजगत्या वापरतो. अनेकदा इंग्रजी शब्दांचा अतिवापर करतो. याचा थोडा विचार करुन आपण वापरलेल्या इंग्रजी शब्दाला मराठी प्रतिशब्द देता आला असता काय? याचा विचार करुन अनिवार्य तेव्हाच इंग्रजी शब्द वापरावा आणि त्यांचा अतिवापर टाळावा.

आपण विचारांच्या क्षेत्रात काम करणारी माणसे आहोत. त्यामुळे आपली जबाबदारी मोठी असल्याचे सांगत मराठी भाषेची प्रतिष्ठा वाढविण्यासाठी प्रत्येकाने आपापल्या परीने ठोस काम करावे, असेही आवाहन प्रल्हाद जाधव यांनी केले.

मराठी भाषा संवर्धन पंधरवडा अंतर्गत महापालिका तर्फे विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. याअंतर्गत १९ जानेवारी रोजी सायं. ४ वाजता लेखिका-निवेदिका डॉ. मृण्मयी भजक यांचे ‘अमेरिका खट्टी मीठी'अनुभवकथनात्मक नाट्य अभिवाचन संपन्न होणार असून त्याद्वारे मराठी चष्म्यातून आंबट गोड अमेरिका मांडली जाणार आहे.

Related Stories

No stories found.
logo
marathi.freepressjournal.in