अग्निशमन अधिकारी पुरुषोत्तम जाधव यांच्या नियुक्तीवर प्रश्नचिन्ह; उपमुख्यमंत्र्यांच्या निर्देशानंतर चौकशीचे आदेश; भरती प्रक्रियेत गैरप्रकार केल्याचा आरोप

नवी मुंबई महानगरपालिकेच्या अग्निशमन विभागातील विभागीय अग्निशमन अधिकारी पुरुषोत्तम जाधव यांच्या नियुक्तीवर गंभीर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. २०१८च्या भरती प्रक्रियेत खोटी कागदपत्रे, बनावट पोलीस तक्रार आणि आरक्षणाचा कथित गैरफायदा घेत नियुक्ती मिळवल्याचा आरोप त्यांच्यावर करण्यात आला आहे.
अग्निशमन अधिकारी पुरुषोत्तम जाधव यांच्या नियुक्तीवर प्रश्नचिन्ह; उपमुख्यमंत्र्यांच्या निर्देशानंतर चौकशीचे आदेश; भरती प्रक्रियेत गैरप्रकार केल्याचा आरोप
अग्निशमन अधिकारी पुरुषोत्तम जाधव यांच्या नियुक्तीवर प्रश्नचिन्ह; उपमुख्यमंत्र्यांच्या निर्देशानंतर चौकशीचे आदेश; भरती प्रक्रियेत गैरप्रकार केल्याचा आरोपप्रातिनिधिक छायाचित्र
Published on

नवी मुंबई : नवी मुंबई महानगरपालिकेच्या अग्निशमन विभागातील विभागीय अग्निशमन अधिकारी पुरुषोत्तम जाधव यांच्या नियुक्तीवर गंभीर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. २०१८च्या भरती प्रक्रियेत खोटी कागदपत्रे, बनावट पोलीस तक्रार आणि आरक्षणाचा कथित गैरफायदा घेत नियुक्ती मिळवल्याचा आरोप त्यांच्यावर करण्यात आला आहे. शिवसेनेचे गटनेते मनोज हळदणकर यांनी पुराव्यांसह तक्रार केल्यानंतर उपमुख्यमंत्री तथा नगरविकास मंत्री यांनी या प्रकरणाच्या चौकशीचे निर्देश नवी मुंबई महापालिका आयुक्त डॉ. कैलास शिंदे यांना दिल्याची माहिती आहे.

हळदणकर यांच्या तक्रारीनुसार, २०१८च्या भरती प्रक्रियेत अंतिम गुणवत्ता यादीत चार उमेदवारांची निवड झाली होती. मात्र, पहिल्या तीन पात्र उमेदवारांना प्रक्रियेतून वगळून चौथ्या क्रमांकावरील पुरुषोत्तम जाधव यांची नियुक्ती करण्यात आल्याचा आरोप आहे.

जाधव हे यापूर्वी एमआयडीसीच्या सेवेत कार्यरत होते. त्यांची मूळ प्रमाणपत्रे तेथे जमा असल्याने ती मिळविण्यासाठी त्यांनी कागदपत्रे हरवल्याचे सांगून पोलीस ठाण्यात अदखलपात्र तक्रार नोंदवली आणि नागपूर येथील नॅशनल फायर सर्व्हिस कॉलेजमधून दुय्यम प्रमाणपत्रे मिळवून महापालिकेला सादर केल्याचा आरोप करण्यात आला आहे.

दरम्यान, नेरूळ येथील सी-होम्स इमारतीतील आगीच्या घटनेत सात अग्निशमन जवान जखमी झाल्याचा तसेच वाशीतील आगीच्या घटनेत तीन नागरिकांचा मृत्यू झाल्याचा उल्लेख तक्रारीत करण्यात आला आहे. अग्निशमन विभागाच्या कार्यपद्धतीवरही प्रश्न उपस्थित करण्यात आले आहेत. शासनाच्या १४ ऑक्टोबर १९९३च्या शासन निर्णयानुसार सेवा प्रवेश नियमांचे उल्लंघन करून नियुक्ती झाल्याचे सिद्ध झाल्यास सेवा समाप्त करण्याची तरतूद असल्याचा दावा करण्यात आला आहे. त्यामुळे चौकशीअंती जाधव यांच्या नियुक्तीबाबत काय निर्णय होतो, याकडे नवी मुंबईकरांचे लक्ष लागले आहे.

पात्रतेवरही प्रश्नचिन्ह

संबंधित सेवा प्रवेश नियमांनुसार या पदासाठी तीन वर्षांचा समकक्ष अनुभव आवश्यक असताना जाधव यांच्याकडे केवळ केंद्र अधिकारी पदाचा अनुभव असल्याचा दावा करण्यात आला आहे. तसेच आवश्यक कालावधीतील नॉन-क्रिमीलेअर प्रमाणपत्राऐवजी जुने प्रमाणपत्र सादर केल्याचाही आरोप आहे. या आरोपांची चौकशी सुरू झाल्याने दोष सिद्ध झाल्यास जाधव यांच्यावर सेवेतून बडतर्फीची कारवाई होण्याची शक्यता व्यक्त होत आहे. मात्र, चौकशी पूर्ण होऊन अधिकृत निष्कर्ष येईपर्यंत आरोपांची सत्यता अंतिम मानता येणार नाही.

(संबधित इंग्रजी बातमी वाचण्यासाठी येथे क्लिक करा.)

logo
marathi.freepressjournal.in