ने‌रूळमधील पायराइट्स स्पावर पोलिसांचा छापा; दोन महिलांची सुटका

नेरूळ सेक्टर-१३ येथील पायराइट्स स्पा या मसाज पार्लरमध्ये मसाज आणि स्पाच्या नावाखाली वेश्याव्यवसाय चालविण्यात येत असल्याची माहिती अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंधक कक्षाला मिळाली होती. त्यानुसार वरिष्ठ पोलीस निरीक्षक पृथ्वीराज घोरपडे व त्यांच्या पथकाने नेरूळमधील पायराइट्स स्पामध्ये बनावट ग्राहक पाठवले होते.
ने‌रूळमधील पायराइट्स स्पावर पोलिसांचा छापा; दोन महिलांची सुटका
(प्रातिनिधिक छायाचित्र)
Published on

नवी मुंबई : मसाज आणि स्पाच्या नावाखाली वेश्याव्यवसाय चालवणाऱ्या नेरूळ सेक्टर-१३ मधील पायराइट्स स्पा सेंटरवर अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंधक कक्षाने गुरुवारी सायंकाळी छापा मारून स्पा मालक आणि चालक या दोघांना ताब्यात घेतले आहे. तसेच मसाजच्या नावाखाली वेश्याव्यवसायासाठी ठेवण्यात आलेल्या २ तरुणींची सुटका केली आहे.

नेरूळ सेक्टर-१३ येथील पायराइट्स स्पा या मसाज पार्लरमध्ये मसाज आणि स्पाच्या नावाखाली वेश्याव्यवसाय चालविण्यात येत असल्याची माहिती अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंधक कक्षाला मिळाली होती. त्यानुसार वरिष्ठ पोलीस निरीक्षक पृथ्वीराज घोरपडे व त्यांच्या पथकाने नेरूळमधील पायराइट्स स्पामध्ये बनावट ग्राहक पाठवले होते. यावेळी सदर स्पामध्ये मसाजच्या नावाखाली वेश्याव्यवसाय चालविण्यात येत असल्याची खात्री पटल्यानंतर अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंधक कक्षाने या स्पावर छापा टाकला. त्यानंतर सदर स्पामध्ये वेश्याव्यवसायासाठी ठेवण्यात आलेल्या दोन तरुणींची सुटका केली. त्यानंतर सदर स्पाचा मॅनेजर दीपक शर्मा (२२) व अरुण सरवटा या दोघांवर पीटा कायद्यांतर्गत गुन्हा दाखल करून दोघांना ताब्यात घेतले आहे.

मसाज करण्याच्या बहाण्याने वेश्याव्यवसाय

सदर स्पा चालक हे झोपडपट्टी भागात राहणाऱ्या २० ते २५ वयोगटातील गरजवंत महिला व तरुणींना हेरून त्यांना मसाज करण्याच्या बहाण्याने कामाला ठेवून त्यांच्याकडून वेश्याव्यवसाय करून घेत असल्याचे तपासात आढळून आले आहे. तसेच ते ग्राहकांकडून वेश्यागमनाचे ५ हजार रुपये घेऊन संबंधित महिला, तरुणींना दोन हजार रुपये देऊन उर्वरित ३ हजार रुपये स्वत: घेत असल्याचे देखील तपासात आढळून आले आहे. गेल्या काही महिन्यांपासून या स्पामध्ये सदरचा कुंटणखाना सुरू असल्याचे आढळून आले आहे.

logo
marathi.freepressjournal.in