लोकलवर केलेल्या दगडफेकीत प्रवासी जखमी

ट्रान्स हार्बर रेल्वे मार्गावरील रबाळे ते ऐरोली रेल्वे स्थानकादरम्यान अज्ञात व्यक्तीने धावत्या लोकलवर दगडफेक केल्याने लोकलमधून प्रवास करणारा प्रवासी गणेश आनंदा खरात (३५) हा जखमी झाल्याची घटना गत शनिवारी रात्री घडली.
लोकलवर केलेल्या दगडफेकीत प्रवासी जखमी
Published on

नवी मुंबई : ट्रान्स हार्बर रेल्वे मार्गावरील रबाळे ते ऐरोली रेल्वे स्थानकादरम्यान अज्ञात व्यक्तीने धावत्या लोकलवर दगडफेक केल्याने लोकलमधून प्रवास करणारा प्रवासी गणेश आनंदा खरात (३५) हा जखमी झाल्याची घटना गत शनिवारी रात्री घडली. सदर दगड गणेशच्या डोळ्याच्या खालच्या बाजूस लागल्याने त्याचा डोळा थोडक्यात बचावला. या घटनेनंतर वाशी रेल्वे पोलिसांनी लोकलवर दगड फेकणाऱ्या अज्ञात व्यक्तीविरोधात गुन्हा दाखल करून त्याचा शोध सुरू केला आहे.

या घटनेत जखमी झालेला गणेश खरात हा कल्याण पूर्वेकडे कुटुंबासह राहण्यास असून तो घणसोली येथील कॉल सेंटरमध्ये कामाला आहे. गत १२ एप्रिल रोजी गणेश खरात हा रात्री सव्वाआठच्या सुमारास कामावरून सुटल्यानंतर त्याने घरी जाण्यासाठी घणसोली रेल्वे स्थानकातून ठाणे लोकल पकडली होती. लोकलमध्ये गर्दी असल्याने गणेश लोकलच्या उजव्या बाजूच्या दरवाजात उभा राहून प्रवास करत होता. सदरची लोकल रबाळे आणि ऐरोली रेल्वे स्थानकादरम्यान आली असता, एरोलीजवळ अज्ञात व्यक्तीने लोकलवर दगड भिरकावला. सदरचा दगड गणेशच्या डोळ्याखाली लागल्याने तो जखमी होऊन रक्तबंबाळ झाला.

या प्रकारानंतर लोकल सहप्रवाशांनी ऐरोली रेल्वे स्थानकात ड्युटीवर असलेल्या आरपीएफ जवानांना याबाबतची माहिती दिली. त्यानंतर गणेशने ऐरोलीतील खासगी रुग्णालयात उपचार घेतल्यानंतर ठाणे रेल्वे पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. वाशी रेल्वे पोलिसांनी या प्रकरणी अज्ञात व्यक्तीविरोधात गुन्हा दाखल करून त्याचा शोध सुरू केला आहे.

logo
marathi.freepressjournal.in