
पेण : माथाडी हमाल संघटनांच्या संपामुळे रेशन दुकानांवरील धान्य पुरवठा बंद झाला आहे. त्यामुळे रायगड जिल्ह्यातील रेशन दुकानातील धान्यसाठा संपल्याने दुकांनाना टाळे लागले आहे. महिना उलटला तरी रायगड जिल्ह्यातील हमाल संघटनांशी यशस्वी वाटाघाटी करण्यात प्रशासन अपयशी ठरले आहे. मात्र जिल्ह्यातील सार्वजनिक वितरण व्यवस्था कोलमडली आहे. गोरगरीब लाभार्थीना रेशनवरील धान्याच्या लाभापासून वंचित रहावे लागत आहे.
रायगड जिल्ह्यात दरमहा ८ हजार मेट्रिक टन तांदूळ आणि २३०० मेट्रिक टन गव्हाचे वितरण होते. हमालांच्या संपामुळे जिल्ह्यातील २१ सरकारी गोदामांतील कामकाज ठप्प झाले असून रेशन दुकानांवर धान्याचा पुरवठा थांबला आहे. या संपाचा थेट परिणाम जिल्ह्यामध्ये मुख्यत्वे ग्रामीण भागातील सार्वजनिक वितरण व्यवस्थेवर झाला आहे. जिल्हा पुरवठा प्रशासनाने ४ एप्रिल २०२५ रोजी नोटीस दिली असतानाही हमाल संस्थांनी काम सुरू केलेले नाही.
यामुळे भारतीय अन्न महामंडळाच्या कळंबोली व तळोजा येथील धान्यवाहने गोदामांबाहेरच उभी आहेत. तसेच दुसऱ्या टप्प्यातील वाहतूक पूर्णतः ठप्प झाली आहे. जिल्ह्यातील १५७ दुकानदारांना मार्च महिन्याचे धान्य प्राप्त झालेले नाही व त्यामुळे लाभाथ्यर्थ्यांना या धान्याचे वाटप करता आलेले नाही. जिल्ह्यातील एकूण १ हजार ४५० रास्त भाव दुकानांपैकी शहरी भागातील १४७ दुकानांच्या थेट वाहतुकीखेरीज, ग्रामीण भागात १ हजार ३०३ दुकानांमध्ये एप्रिल महिन्याचे धान्य अजूनही पोहोचलेले नाही.