
ऐरवी आपल्या फिरकीच्या बळावर संघाला जिंकणाऱ्या (३८ चेंडूंत ५० धावा) बुधवारी फलंदाजीत चमक दाखवली. अश्विनने साकारलेल्या आयपीएल कारकीर्दीतील पहिल्या अर्धशतकाच्या बळावर राजस्थान रॉयल्सने दिल्ली कॅपिटल्सपुढे विजयासाठी १६१ धावांचे लक्ष्य ठेवले.
नवी मुंबईतील डी. वाय. पाटील स्टेडियमवर झालेल्या या सामन्यात प्रथम फलंदाजी करताना राजस्थानने भरवशाच्या जोस बटलरला (७) स्वस्तात गमावले. यशस्वी जैस्वालही (१९) यावेळी छाप पाडू शकला नाही. त्यानंतर अश्विनला फटकेबाजी करण्यासाठी पुढे पाठवण्यात आले. त्याने संघ व्यवस्थापनाचा विश्वास सार्थ ठरवताना चार चौकार आणि दोन षटकारांसह ५० धावा फटकावल्या. त्याने देवदत्त पडिक्कलसह तिसऱ्या विकेटसाठी ५३ धावांची भागीदारी रचली.
अश्विन बाद झाल्यावर पडिक्कलने सहा चौकार व दोन षटकारांसह ३० चेंडूंत ४८ धावा फटकावून राजस्थानला २० षटकांत ६ बाद १६० धावांपर्यंत मजल मारून दिली. दिल्लीसाठी चेतन साकारिया, आनरिख नॉर्किए आणि मिचेल मार्श यांनी प्रत्येकी दोन बळी मिळवले.