

नवी मुंबई : अवकाळी पाऊस आणि कोकणातील वादळामुळे यंदा आंबा उत्पादन घटण्याची शक्यता वर्तवली जात होती. त्यामुळे अक्षय्य तृतीयेच्या पार्श्वभूमीवर आंब्याचे दर गगनाला भिडतील, अशी भीती होती. मात्र सर्व अंदाज फोल ठरवत नवी मुंबई एपीएमसी येथे आंब्याची विक्रमी आवक झाल्याने दर सामान्यांच्या आवाक्यात आले आहेत.
शनिवारी एकाच दिवशी तब्बल ९४ हजार ६ पेट्यांची आवक झाली असून, सणासुदीच्या काळात बाजारात मोठी उलाढाल होण्याची शक्यता आहे. मात्र एप्रिलच्या दुसऱ्या आठवड्यापासून आवक वाढू लागली असून, अक्षय्य तृतीयेच्या पार्श्वभूमीवर ती उच्चांकावर पोहोचली आहे. वाढलेल्या पुरवठ्याचा थेट परिणाम दरांवर झाला असून, घाऊक बाजारात हापूस आंब्याचे दर काही प्रमाणात घसरले आहेत.
सध्या दर्जानुसार प्रति पेटी (५ रुपये दर मिळत आहेत. किरकोळ डझन) सुमारे १५०० ते ४००० बाजारात छोटे आंबे ६० ते ८० रुपये तर मोठे आंबे १०० रुपयांपर्यंत मिळण्याची शक्यता आहे.
कोकणपट्ट्याचा मोठा वाटा
या आवकमध्ये कोकणपट्ट्याचा मोठा वाटा असून, रत्नागिरी, देवगड आणि सिंधुदुर्ग येथून ५८ हजार ८९४ पेट्या दाखल झाल्या आहेत, तर इतर राज्यांतून ३५ हजार ११२ पेट्यांची आवक झाली आहे. यंदा कोकणात अवकाळी पाऊस, बदलते हवामान आणि कीडरोगांचा फटका बसल्याने हंगामाच्या सुरुवातीला आवक कमी होती आणि दर उच्च पातळीवर होते.
आठवड्याच्या सुरुवातीला ४० ते ५० हजार पेट्यांपर्यंत असलेली आवक शनिवारी जवळपास दुप्पट झाली. एप्रिलच्या दुसऱ्या आठवड्यापासून आवक वाढू लागली.
महाराष्ट्रातील अनेक भागांत अक्षय्य तृतीयेपासून आंबा खाण्याची परंपरा आहे. या दिवशी पूजेत आंब्याला नैवेद्य म्हणून विशेष मान दिला जातो. दर आवाक्यात आल्याने नागरिकांमध्ये समाधानाचे वातावरण असून, यंदा अक्षय्य तृतीया गोड झाली.
सुप्रिया शिंदे
पावसाचा वादळाचा काही प्रमाणात परिणाम झाला असला तरी उत्पादन समाधानकारक झाले आहे. त्यामुळे पुढील काळातही आंब्याची आवक वाढण्याची शक्यता आहे.
संजय पानसरे, संचालक फळ बाजार समिती