नवी मुंबई : आजारी लोकांना मदत करा, आजारी लोकांना पैशाच्या बाबतीत शक्य तितकी मदत केली पाहिजे या चाणक्य नितीच्या अनुषंगाने शासनाने ‘मुख्यमंत्री वैद्यकीय अर्थसहाय्यता कक्ष'ची उभारणी करण्यात आली आहे.
या माध्यमातून शासनातर्फे दररोज शेकडो नागरिकांना आर्थिक मदतीचे वाटप होत आहे. याचअनुषंगाने ‘बेलापूर'च्या आमदार मंदा म्हात्रे यांच्या सातत्यपूर्ण पाठपुराव्यामुळे नेरूळ, सेक्टर-६ मधील तुलसीदर्शन या इमारतीतील वरच्या मजल्यावरील स्लॅब कोसळून झालेल्या दुर्घटनेतील मृतांना आणि जखमींना ३ लाख रुपयांची मदत ‘मुख्यमंत्री वैद्यकीय अर्थसहाय्यता कक्ष'द्वारे वितरीत करण्यात आली आहे. यामुळे बाधितांमध्ये आनंदाचे वातावरण पसरले आहे.
२३ ऑगस्ट २०२३ रोजी सायंकाळी ८ च्या सुमारास नेरूळ, सेक्टर-६ मधील भूखंड क्र.३७३ वर असणाऱ्या तुलसीदर्शन या इमारतीमध्ये तिसऱ्या मजल्यावरील स्लॅब खाली एकावर एक कोसळून झालेल्या दुर्घटनेत २ जणांचा मृत्यू तर २ जण जखमी झाले होते. या दुर्घटनेनंतर मानवतावादी दृष्टिकोन ठेवून आमदार मंदा म्हात्रे यांनी तुलसीदर्शन इमारत दुर्घटनेतील मृतांच्या तसेच जखमींच्या नातेवाईकांना ‘मुख्यमंत्री वैद्यकीय अर्थसहाय्यता कक्ष'द्वारे आर्थिक मदत मिळवून देण्यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे पत्रव्यवहार केला होता. तसेच सातत्याने याबाबत पाठपुरावाही सुरू ठेवला होता. अखेरीस आ. मंदा म्हात्रे यांच्या या सातत्यपूर्ण पाठपुराव्याला यश आले आहे.
गरजूंनी लाभ घ्यावा
तुलसीदर्शन इमारत दुर्घटनेतील मृतांच्या आणि जखमींच्या नातेवाईकांना आर्थिक मदत मिळवून दिल्याबद्दल आमदार मंदा म्हात्रे यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे आभार देखील मानले आहेत. ‘मुख्यमंत्री वैद्यकीय अर्थसहाय्यता कक्ष'च्या माध्यमातून १ जुलै २०२२ ते १ नोव्हेंबर २०२३ या कालावधीत २३ रुग्णांना जवळपास २५ लाख ३२ हजार ५०० रुपयांची आर्थिक मदत मिळाली आहे. यामुळे अनेक रुग्णांना अक्षरशः जीवनदान मिळाले आहे. गोरगरीब, गरजू रुग्णांना दुर्धर आजारावरील उपचार आणि महागड्या शस्त्रक्रियांसाठी ‘मुख्यमंत्री वैद्यकीय अर्थसहाय्यता निधी'द्वारे आर्थिक मदत दिली जाते. त्यामुळे या निधीचा जास्तीत जास्त गरजूंनी लाभ घ्यावा, असे आवाहनही आ. मंदा म्हात्रे यांनी केले आहे.
‘मुख्यमंत्री वैद्यकीय अर्थसहाय्यता कक्ष’द्वारे तुलसीदर्शन इमारत दुर्घटनेमधील दोघा मृतांना प्रत्येकी १ लाख रुपये याप्रमाणे २ लाख रुपये आणि दोघा जखमींना प्रत्येकी ५० हजार रुपये याप्रमाणे १ लाख रुपये असे एकूण ३ लाख रुपये मंजूर करण्यात आले आहे. या मदतीचा निधी ३ जानेवारी २०२४ रोजी ठाणे जिल्हाधिकारी कार्यालयाच्या बँक खात्यात वर्ग करण्यात आला आहे. कायदेशीर बाबी पूर्ण झाल्यानंतर लवकरच सदर मदतीचा निधी ठाणे जिल्हाधिकारी कार्यालयाच्या वतीने तुलसीदर्शन इमारत दुर्घटनेतील मृतांच्या आणि जखमींच्या नातेवाईकांकडे सुपूर्द केला जाईल.
- मंदा म्हात्रे, आमदार