लाचप्रकरणी महसूल सहाय्यक एसीबीच्या जाळ्यात; रंगेहाथ पकडल्यावर झाली अटक

पनवेल तहसील कार्यालयातील महसूल सहाय्यक किरण अर्जुन गोरे (४८) यांना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या नवी मुंबई युनिटने गुरुवारी सायंकाळी तक्रारदाराकडून ४० हजारांची लाच स्वीकारताना रंगेहाथ पकडले.
बेकायदा भारतीय पासपोर्टसह बांगलादेशी नागरिकाला मुंबई विमानतळावर अटक
बेकायदा भारतीय पासपोर्टसह बांगलादेशी नागरिकाला मुंबई विमानतळावर अटक

नवी मुंबई : पनवेल तहसील कार्यालयातील महसूल सहाय्यक किरण अर्जुन गोरे (४८) यांना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या नवी मुंबई युनिटने गुरुवारी सायंकाळी तक्रारदाराकडून ४० हजारांची लाच स्वीकारताना रंगेहाथ पकडले. गोरे यांनी वडिलोपार्जित शेतजमिनीची नोंद कमी करून भोगवटादार वर्ग-२ वरून सदर जमिनीचा भोगवटादार वर्ग-१ असे दोन स्वतंत्र सर्व्हे क्रमांकाच्या जमिनीची नोंद करून देण्यासाठी लाचेची मागणी केली होती. गोरे यांनी यापैकी एका जमिनीची नोंद करण्याकरिता ४० हजारांची लाच स्वीकारल्यानंतर त्यांना सापळा रचून अटक करण्यात आली.

पनवेल तालुक्यातील गिरवले येथे राहणारे जयदास गायकर यांनी त्यांच्या वडिलोपार्जित शेतजमीनचे मुंबई कुळव्यवस्थापन व शेतजमिनी कायद्यांतर्गत जमिनीची नोंद कमी करून भोगवटादार वर्ग-२ वरून सदर जमिनीची भोगवटादार वर्ग-१ अशी दोन स्वतंत्र सर्व्हे क्रमांकाच्या जमिनीची नोंद करण्यासाठी पनवेल तहसील कार्यालयात गत जानेवारी महिन्यात अर्ज सादर केला होता. मात्र या कामासाठी पनवेल तहसील कार्यालयातील महसूल सहाय्यक किरण गोरे यांनी गायकर यांच्याकडे १ लाख रुपये लाचेची मागणी केली होती. त्यामुळे गायकर यांनी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या नवी मुंबई येथील कार्यालयात तक्रार दिली होती.

सदर तक्रारीच्या अनुषंगाने लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने लाचेच्या मागणीची सत्यता पडताळणी केली असता, किरण गोरे यांनी गायकर यांच्याकडे तडजोडीअंती ८० हजार रुपये लाचेच्या रकमेची मागणी केल्याचे निष्पन्न झाले.

गोरे यांनी एका जमिनीच्या नोंदीकरिता ४० हजार रुपये लाचेची मागणी केली असता, लाचलुचपत प्रतिबंधक विभगाने गुरुवारी सायंकाळी पनवेल तहसील कार्यालयात सापळा लावला होता. यावेळी किरण गोरे यांनी गायकर यांच्याकडून ४० हजार रुपयांची लाच स्वीकारल्यानंतर त्यांना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने रंगेहाथ पकडले. त्यानंतर रात्री उशिरा गोरेविरोधात पनवेल शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करून त्यांना अटक करण्यात आली. सदरची कारवाई पोलीस उपअधीक्षक शिवराज म्हेत्रे व त्यांच्या पथकाने केली.

logo
marathi.freepressjournal.in