नवी मुंबई : देशात उष्णतेची लाट पसरली असून, नवी मुंबईचा पारा देखील ४० अंशावर पोहोचला आहे. त्यामुळे प्रशासनाकडून उष्णतेच्या लाटेबाबत अलर्ट जारी करण्यात आला आहे. अशा परिस्थितीत ३-१५ वर्षे वयोगटातील मुलांमध्ये डिहायड्रेशनचे प्रकार वाढण्याची शक्यता असल्याने अत्यंत सावध राहण्याची गरज आहे. त्यामुळे आपली मुलं दररोज किमान १० ग्लास पाणी पित असल्याची खात्री पालकांनी करणे गरजेचे आहे. तसेच पाण्याबरोबरच आहारात द्रव पदार्थांचे सेवन, ओरल रिहायड्रेटिंग तसेच दुपारच्या वेळी घराबाहेर पडणे टाळावे, अशा सूचना डॉक्टरांकडून करण्यात आल्या आहेत.
उष्णतेची लाट ही सर्वच वयोगटातील व्यक्तीवर परिणाम करत असून प्रौढांमध्ये तसेच लहान मुलांमध्ये मूर्च्छा येणे, चक्कर येणे, डोकेदुखी आणि बेशुद्ध पडणे असे प्रकार होत असल्याचे आढळून येत आहेत. घराबाहेर खेळणे आणि व्यायाम केल्याने मुलांच्या शारीरीक विकासात मदत असली तरी, अतिउष्णतेमध्ये ही क्रिया करणे मुलांसाठी योग्य नाही. उच्च तापमान आणि अति उष्णतेमुळे मुले आजारी पडतात कारण त्यांचे निर्जलीकरण होते (अत्याधिक घाम येणे), उष्णतेमुळे थकवा येतो आणि उष्माघातासारखी समस्या उद्भवू शकते. त्याचप्रमाणे दुपारच्या उन्हात मुलांना घराबाहेर पाठवू नये विशेषत: दुपारी १२ ते ४ या वेळेत खेळणे किंवा व्यायाम करणे टाळावे, दुपारच्या वेळेत शाळेत किंवा बाहेर जाताना टोपी घालावी तसेच छत्रीचा वापर करावा. मुलांना हलक्या रंगाचे सैल सुती कपडे घालावे असेही डॉक्टरांनी उष्णतेपासून बचाव करण्यासाठी सल्ला दिला आहे.
शाळांच्या वेळेत बदल करा; ‘आप-नवी मुंबई’तर्फे महापालिका शिक्षण विभागाला पत्र
सध्या राज्यभरात उष्णतेची लाट असल्याचे हवामान खात्याने जाहीर केले आहे. शाळेला सदर बाब माहिती असताना देखील अशा वातावरणात विद्यार्थ्यांना शाळेत बोलावून त्यांच्या जीवाशी खेळणे कितपत योग्य आहे? इतक्या उन्हात शाळा सुरू ठेवणे म्हणजे धोकादायक आहे. त्या अनुषंगाने काही पालकांच्या तक्रार वजा विनंतीनुसार ‘आप-नवी मुंबई'च्या वतीने नवी मुंबई महापालिका शिक्षण विभागाला पत्र देऊन शाळांच्या वेळेत बदल करण्याची मागणी करण्यात आली आहे. ‘आप-नवी मुंबई'तर्फे महापालिका मुख्यालयामध्ये महापालिका शिक्षणाधिकारी अरुणा यादव यांना पत्र देण्यात आले आहे. या उन्हाळी हंगामामध्ये कडक उन्हामुळे शाळा दुपारपर्यंत सुरू न ठेवता खासगी शाळांनी सकाळी ७ ते ११ वाजेपर्यंत शाळा सुरू ठेवावी किंवा जास्त तापमान असल्यास लहान बालकांच्या शाळेला सुट्टी द्यावी, अशी मागणी ‘आप'ने सदर पत्रातून महापालिका शिक्षण विभागाकडे केली आहे. याप्रसंगी ‘आप'चे माजी नवी मुंबई शहर अध्यक्ष श्यामभाऊ कदम, नवी मुंबई उपाध्यक्ष प्रीती शिंदेकर, युवा अध्यक्ष महेश क्षीरसागर, बेलापूर विधानसभा अध्यक्ष प्रा. डॉ. विलास उजगरे, बेलापूर महिला अध्यक्ष स्नेहा उजगरे, नेरूळ अध्यक्ष जावेद सय्यद तसेच इतर पदाधिकारी-कार्यकर्ते उपस्थित होते.
गत महिन्यापासून डिहायड्रेशनच्या समस्येने पीडित बालरुग्णांची संख्या वाढली आहे. खेळण्याच्या नादात मुले अनेकदा पाणी पिण्याकडे दुर्लक्ष करतात, त्यामुळे भरपूर पाणी पिणे आणि कार्बोनेटेड पेय किंवा शर्करायुक्त पेयांचे सेवन करणे गरजेचे आहे.
- डॉ. संजू सिदाराद्दी, (बालरोगतज्ज्ञ )
शरीरातील पाण्याचे प्रमाण वाढवणे हाच डिहायड्रेशन दूर करण्याचा सर्वात सोपा उपाय आहे. डिहायड्रेशन हे घरच्या घरी ठीक होऊ शकते, लक्षणे दिसल्यास बाळाला ओरल रिहायड्रेशन सोल्युशन अर्थात ओआरएस द्यावे. कधी कधी साधे पाणी पुरेसे नसते. अशावेळी साखर, मीठ आणि पाण्याचे मिश्रण असलेले पाणी फायद्याचे ठरते.
- डॉ. वृक्षल शामकुवर, (बालरोगतज्ज्ञ)