नवी मुंबईत भिंत फोडून लक्ष्मी ज्वेलर्सवर दरोडा

कामोठे पोलिसांनी या प्रकरणातील दरोडखोरांविरोधात गुन्हा दाखल करुन त्यांचा शोध सुरू केला आहे.
नवी मुंबईत भिंत फोडून लक्ष्मी ज्वेलर्सवर दरोडा

अज्ञात दरोडेखोरांच्या टोळीने कामोठे सेक्टर- ११ मधील लक्ष्मी ज्वेलर्सच्या दुकानाला भगदाड पाडून सदर दुकानातील १५ किलो वजनाचे ५ लाख ८८ हजार रुपये किमतीच्या चांदीच्या वस्तु चोरून नेल्याची घटना उघडकीस आली आहे. कामोठे पोलिसांनी या प्रकरणातील दरोडखोरांविरोधात गुन्हा दाखल करुन त्यांचा शोध सुरू केला आहे.

कामोठे सेक्टर-११ मधील बसंतबहार सोसाटीमधील शॉप नंबर - ९ मध्ये सुरेश कुमावत (३९) याचे लक्ष्मी ज्वेलर्स नावाचे दुकान आहे. रविवारी रात्री कुमावत आपले दुकान बंद करुन गेला असताना लक्ष्मी ज्वेलर्सच्या पाठीमागे असलेल्या ११ नंबर शॉपमधून दरोडेखोरांनी भिंत फोडून लक्ष्मी ज्वेलर्समध्ये प्रवेश केला. त्यानंतर दरोडेखोरांनी गॅस कटरच्या सहाय्याने दुकानातील तिजोरी फोडून त्यातील तब्बल १५ किलो वजनाच्या ५ लाख ८८ हजार रुपये किमतीचे चांदीचे पैंजण, झाले, जोडवे, समई व इतर चांदीच्या वस्तु चोरून नेल्या.

सोमवारी सकाळी ज्वेलर्स मालक दुकान उघडण्यास आल्यानंतर दुकानातील सर्व दागिने लुटून नेण्यात आल्याचे त्यांच्या निदर्शनास आले. या घटनेची माहिती मिळाल्यानंतर कामोठे पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. सदर ठिकाणी तिजोरी फोडण्यासाठी वापरण्यात आलेले ऑक्सिजन सिलेंडर, गॅस सिलेंडर, गॅस कटर, गॅस रेग्युलेटर, कटावणी, स्क्रू ड्रायव्हर, पाना, हातोडी, दारुच्या बाटल्या आदी वस्तु आढळून आल्या. सदर वस्तु पोलिसांनी ताब्यात घेऊन दरोडेखोरांविरोधात गुन्हा दाखल केला आहे.

Related Stories

No stories found.
marathi.freepressjournal.in