नवी मुंबईत जप्त मालमत्तेची एप्रिलपासून विक्री; महापालिकेची ४५४ कर थकबाकीदारांना नोटीस

नवी मुंबई महापालिका मालमत्ताकर विभागाने कर थकबाकी असलेल्या जप्त मालमत्तेची लिलावाद्वारे विक्री करण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे.
नवी मुंबईत जप्त मालमत्तेची एप्रिलपासून विक्री; महापालिकेची ४५४ कर थकबाकीदारांना नोटीस
Published on

नवी मुंबई : नवी मुंबई महापालिका मालमत्ताकर विभागाने कर थकबाकी असलेल्या जप्त मालमत्तेची लिलावाद्वारे विक्री करण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे. याबाबत नवी मुंबई महापालिका क्षेत्रातील एकूण ८ वॉर्डमधील ४५४ जणांना नोटिसा बजावण्यात आलेल्या आहेत. त्या अनुषंगाने जप्तीची कारवाई प्रस्तावित असलेल्या मालमत्ताधारकांनी आपला थकीत मालमत्ता कर त्वरित भरावा, असे आवाहन महापालिका आयुक्त डॉ. कैलास शिंदे यांनी केले आहे. अन्यथा जप्त मालमत्तेवर एप्रिलपासून लिलाव कारवाई करण्यात येईल, असेही सूचित करण्यात आले आहे.

‘नमुंमपा’च्या अखत्यारित असणाऱ्या विविध मालमत्तांवर ‘कर आकारणी-कर संकलन विभाग’ यांच्यामार्फत मालमत्ता कर आकारणी आणि वसुलीची कार्यवाही करण्यात येते. मालमत्ता कर आकारणी पुस्तकात नोंद असलेल्या मालमत्ताकरांची देयके (बिल) महाराष्ट्र महानगर पालिका अधिनियमातील अनुसूची 'ड' प्रकरण ८ नियम ३९ नुसार तयार करण्यात येतात. विहित मुदतीत मालमत्ता कर देयकांची रक्कम न भरलेल्या मालमत्तेवर जप्तीची कारवाई करण्यात येते. या जप्त मालमत्तांवर लिलावाद्वारे विक्री कार्यवाहीची तरतूद देखील नियमानुसार करण्यात आलेली आहे.

थकीत मालमत्ता कराच्या वसुलीसाठी जप्त केलेल्या मालमत्तेची लिलावाद्वारे विक्री करणे आणि त्यासाठी मालमत्तेचे मुल्यांकन करणे गरजेचे आहे. त्यामुळे जप्त केलेल्या मालमत्तेच्या लिलाव मूल्यांकनासाठी अधिकृत शासकीय मुल्यकारांची (गर्व्हनमेंट व्हॅल्युअर्स) नियुक्ती करण्यात येत आहे.

अभय योजनेचा लाभ घेण्याचे आवाहन

कर थकबाकीदारांना करभरणा करताना आर्थिक दडपण न येण्यासाठी नवी मुंबई महापालिकेने १० मार्चपासून ‘अभय योजना' सुरू केली आहे. थकीत कराच्या विलंब शुल्कावर ५० टक्के सूट देणाऱ्या ‘अभय योजने'चा ३१ मार्चपर्यंत लाभ घेण्याचे आवाहन करण्यात आले आहे. सुट्टीच्या दिवशी (शनिवार-रविवार) नमुंमपा मुख्यालय आणि इतर विभागीय कार्यालयांमध्ये कर भरणा केंद्र (कॅश काऊंटर्स) सकाळी १० ते सायंकाळी ५ या वेळेत सुरू राहतील, असे महापालिकामार्फत सूचित करण्यात आले आहे.

logo
marathi.freepressjournal.in