आ. संदीप नाईक, सागर नाईक अमित ठाकरेंच्या भेटीला

नवी मुंबईतील लोकनेते, आमदार गणेश नाईक यांचे पुत्र माजी आमदार संदीप नाईक आणि नवी मुंबईचे माजी महापौर सागर नाईक यांनी अमित ठाकरे यांची भेट घेतली. नवी मुंबईतील राजकीय वर्तुळात विविध चर्चाना उधाण
आ. संदीप नाईक, सागर नाईक अमित ठाकरेंच्या भेटीला
Published on

महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेच्या पुनर्बांधणीकरिता मनविसेचे नवनिर्वाचित अध्यक्ष अमित ठाकरे संपूर्ण महाराष्ट्र पिंजून काढत आहेत. मनविसेत काम करण्यासाठी इच्छुक असलेल्या कार्यकर्त्यांशी थेट संवाद साधत मनविसेला बळकटी देण्याचे काम अमित यांच्याकडून केले जात आहे. काही दिवसांपूर्वीच त्यांनी कोकण, पालघर, ठाणे जिल्ह्यात दौरा केला. त्यानंतर सोमवार २५ जुलै रोजी नवी मुंबईत अमित यांनी दौरा करत मनविसेत काम करण्यासाठी इच्छुक असलेल्या महाविद्यालयीन तरुण तरुणींशी थेट संवाद साधला. याचवेळी नवी मुंबईतील लोकनेते, आमदार गणेश नाईक यांचे पुत्र माजी आमदार संदीप नाईक आणि नवी मुंबईचे माजी महापौर सागर नाईक यांनी अमित ठाकरे यांची भेट घेतली. या भेटीनंतर नवी मुंबईतील राजकीय वर्तुळात विविध चर्चाना उधाण आले असून आगामी नवी मुंबई महापालिका निवडणुकीचे मनसे-भाजपा युतीचे अप्रत्यक्ष आमंत्रणच यावेळी दिल्याचे बोलले जात आहे.

नवी मुंबई महापालिकेची फेब्रुवारी महिन्यात प्रभागरचना पार पडली. येत्या काही दिवसात प्रथमच नव्या प्रभागरचनेनुसार पॅनेल पद्धतीने निवडणूका होणार असल्याने सर्वच पक्षांची धाकधूक वाढली आहे. तर काही दिवसांपूर्वी न भूतो न भविष्यती असा बंड पुकारत झालेल्या राज्यातील सत्ता बदलामुळे अनेक आजी-माजी, इच्छुकांची स्वप्ने हवेत विरली आहेत. राज्यात इतर पक्षांचा ताळमेळ नसताना मनसे पक्षाची पावले मात्र राज्यातील विविध भागात वेगाने पडत असल्याचे दिसून येत आहे. अशातच मागील काही दिवसांपासून मनसे आणि भाजपा यांच्यातील उघड मैत्री विविध माध्यमातून सर्वश्रुत आहे. नेमके याच पार्श्वभूमीवर आगामी नवी मुंबई महापालिका निवडणुकांमध्ये भाजपाची एकहाती सत्ता आणण्यासाठी आमदार गणेश नाईक विविध पर्याय चाचपडून बघत आहेत. तर मनसेप्रमुख राज ठाकरे यांच्याशी असलेले आमदार गणेश नाईक यांचे मैत्री संबंध निवडणुकांवेळी देखील टिकवून ठेवण्यासाठी नाईक सर्वतोपरी प्रयत्न करत आहेत. अशातच सोमवार २५ जुलै रोजी मनविसेचे अध्यक्ष अमित ठाकरे नवी मुंबईत महासंपर्क दौऱ्यासाठी आले असता माजी आमदार संदीप नाईक आणि माजी महापौर सागर नाईक यांनी अमित ठाकरे यांची भेट घेत शाल, पुष्पगुच्छ देऊन त्यांचे नवी मुंबईत स्वागत केले. यावेळी नवी मुंबईचे मनसे शहरप्रमुख गजानन काळे आणि त्यांचे इतर सहकारी देखील उपस्थित होते. दरम्यान, या भेटीनंतर सर्वच पक्षांच्या नेत्यांच्या भुवया उंचावल्या असून आगामी निवडणुकांच्या दृष्टीने नेमक्या कोणत्या चर्चा या भेटीवेळी झाल्या? ही भेट सदिच्छा होती की राजकीय? अशा अनेक चर्चा राजकीय वर्तुळात रंगल्या आहेत.

logo
marathi.freepressjournal.in