
पनवेल : शासनाची कोणतीही परवानगी न घेता पनवेलमधील चिखले गावातील शासकीय जमिनीवर प्लॉटिंग करून सदर जागेवर बेकायदेशीररीत्या अतिक्रमण करणाऱ्या चिखले ग्रुप ग्रामपंचायतचे सरपंच, उपसरपंच व सदस्यांसह १३ जणांविरोधात पनवेल तालुका पोलिसांनी बीएनएस कलम ३२९(३), ३(५) अंतर्गत गुन्हा दाखल केला आहे. तसेच त्यांच्यावर पुढील कारवाईला सुरुवात केली आहे.
पनवेल तालुक्यातील चिखले गावा लगतची ३३/० या जागेचा ताबा चिखले ग्रामपंचायतकडे असल्याने चिखले ग्रामपंचायतीच्या सरपंच, उपसरपंच आणि इतर आठ सदस्यांनी सदर जागा गावठाण विस्तारासाठी मिळावी यासाठी २७ फेब्रुवारी २०२४ रोजी मासिक सभा घेतली
होती. त्या सभेमध्ये सदर जागेवरील उंच चढ भागाची माती उत्खनन करून सदर जागेचे सपाटीकरण करण्यासंदर्भात विषय मांडण्यात येऊन सदर विषय सर्वानुमते मंजूर करून घेतला. त्यावेळी सरपंच, उपसरपंच व इतर सदस्यांनी आपल्या पदाचा गैरवापर करून सचिवाचे मत विचारात न घेता सदर ठराव मंजूर करून घेतला. याबाबत ग्रामसेविकेने गटविकास अधिकाऱ्यांकडे पत्रव्यवहार केला होता.
दरम्यान, कोणत्याही प्रकारची शासकीय परवानगी न घेता चिखले गावातील शासकीय जमिनीवर प्लॉट पाडण्यात आले. तसेच प्लॉटिंग करण्यात आलेल्या जागेवर अंदाजे ८० प्लॉटवर ग्रामस्थांनी लाकडी बांबू आणि प्लास्टिक पेपरच्या सहाय्याने शेड बांधले. यावरून चिखले ग्रामपंचायतीच्या सरपंच, उपसरपंच व इतरांनी शासनाची कोणतीही परवानगी न घेता चिखले गावातील शासकीय जमिनीवर प्लॉटिंग करून सदर जागेवर बेकायदेशीररीत्या अतिक्रमण केल्याचे उघडकीस आल्यानंतर गटविकास अधिकाऱ्यांनी दिलेल्या सूचनेनुसार ग्रामसेविकेने पनवेल तालुका पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली.
प्लॉटचे बेकायदेशीर वाटप
डिसेंबर २०२४ रोजी झालेल्या ग्रामसभेत सदर जमिनीवर गरजू ग्रामस्थांना दोन गुंठे आकाराचे भूखंड वाटप करण्याबाबतचा तसेच त्यावर ग्रामस्थांनी घरे बांधल्यानंतर त्यांना घरपट्टी देण्याबाबतचा ठराव सरपंच, उपसरपंच व इतर सदस्यांनी संमत करून घेतला. मात्र, या विषयाला ग्रामसेविकेने विरोध करून गत जानेवारी महिन्यात त्यांनी गटविकास अधिकाऱ्यांकडे पत्र व्यवहार केला होता.
गुन्हा दाखल करण्यात आलेल्या पदाधिकाऱ्यांची नावे
या प्रकरणात गुन्हा दाखल करण्यात आलेल्यांमध्ये सरपंच दीपाली तांडेल, उपसरपंच पूजा पाटील, सदस्य अविनाश पाटील, रघुनाथ पाटील, वर्षा पंडित, प्रतीक्षा म्हात्रे, मानसी शेळके, रेणुका चौधरी तसेच प्रवीण पाटील, सुरेश पाटील (दोघे सांगडे), दत्तात्रय तांडेल, कृष्णा पवार, मच्छिंद्र पाटील या १३ जणांचा समावेश आहे.