
नवी मुंबई : सीवुड्स येथील दिल्ली पब्लिक स्कूलच्या स्कूल बसचालकाने ४ वर्षीय मुलाचे लैंगिक शोषण केल्याची घटना घडली. याप्रकरणी एनआरआय पोलिसांनी या स्कूल बसचालकाविरोधात लैंगिक शोषणासह पोक्सो कलमानुसार गुन्हा दाखल करून त्याला अटक केली आहे.
याबाबत शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे उपनेते मोरे, जिल्हाप्रमुख प्रकाश पाटील यांच्या नेतृत्वाखाली पदाधिकारी-शिवसैनिक २५ एप्रिल रोजी शाळा प्रशासनाला जाब विचारण्याकरिता गेले असता शालेय व्यवस्थापनाने गेट उघडण्यास नकार दिला. त्यामुळे शिवसैनिकांचा संताप अनावर झाला आणि शाळेमध्ये घुसून मुख्याध्यापकांना चांगलेच धारेवर धरले. याप्रकरणी मुख्याध्यापकांविरोधात आणि शाळा प्रशासनाविरोधात घोषणाबाजी करण्यात आली. तसेच पोलीस प्रशासनाला मुख्याध्यापकांना सदर प्रकरणात सहआरोपी करण्याची मागणी निवेदनाद्वारे करण्यात आली. मनसे पदाधिकाऱ्यांनी डीपीएस शाळेचे मुख्याध्यापक हरिशंकर वशिष्ठ यांना घेराव घातला.