नवी मुंबईत विभागनिहाय पार्किंग प्लॉट; पार्किंग व्यवस्थेसाठी आयुक्त राजेश नार्वेकरांची गतिमान कार्यवाही

नवी मुंबई शहरापुढे पार्किंग समस्या दूर करण्यासाठी महापालिका आयुक्त राजेश नार्वेकर यांनी नियोजनबद्ध पावले उचलण्यास सुरुवात केली आहे.
नवी मुंबईत विभागनिहाय पार्किंग प्लॉट; पार्किंग व्यवस्थेसाठी आयुक्त राजेश नार्वेकरांची गतिमान कार्यवाही

नवी मुंबई : नवी मुंबई शहरापुढे पार्किंग समस्या दूर करण्यासाठी महापालिका आयुक्त राजेश नार्वेकर यांनी नियोजनबद्ध पावले उचलण्यास सुरुवात केली आहे. त्यादृष्टीने वारंवार त्यांनी आढावा बैठका घेत विभागनिहाय पार्किंग प्लॉट विकसित करण्याकडे विशेष लक्ष दिले आहे.

या अनुषंगाने सीबीडी-बेलापूर, सेक्टर-१५ मध्ये भूखंड क्र.३९ या ४७०५ चौ.मी. क्षेत्रफळाच्या भूखंडावर ४ मजली वाहनतळ विकसित करण्यात आला असून येत्या काही कालावधीतच सदर वाहनतळ लोकांच्या वापरासाठी खुला होऊन या परिसरातील वाहनतळाची समस्या मोठ्या प्रमाणात मार्गी लागणार आहे. येथे ३९६ चारचाकी आणि १२१ दुचाकी वाहनांच्या पार्किंगची व्यवस्था असणार आहे.

त्याचप्रमाणे सेक्टर-१५ येथे प्लॉट क्र.७२ या ६९०० चौ.मी. क्षेत्रफळाच्या भूखंडावर तसेच सेक्टर-३० ए, वाशी येथे हॉटेल तुंगा समोरील ११३०० चौ. मी. क्षेत्रफळाच्या भूखंडावर वाहनतळ विकसीत करण्याचे नियोजन करण्यात येत आहे. सदर भूखंडांवरील वाहनतळ शासन आणि खासगी संस्था भागीदारी तत्वावर विकसित करण्याच्या पर्यायांचा अंदाज घेण्यात येत असून त्यादृष्टीने अशाप्रकारे वाहनतळ विकसित करण्याचे फायदे, यासाठी आवश्यक परवानग्या, त्या अनुषंगाने करावयाची कार्यवाही याबाबत आयुक्तांना अभियांत्रिकी विभागामार्फत माहितीपूर्ण सादरीकरण करण्यात आले.

सदर वाहनतळ खासगी संस्था भागीदारी तत्वावर विकसित करण्याकरिता फिजीबिलिटी तपासून रिपोर्ट तयार करण्याचे काम मे. फिडबॅक इन्फ्रा प्रा. लि. या संस्थेमार्फत करून घेण्यात येत असून या जागांचा वाहनतळासोबतच वाणिज्य वापरासाठीही उपयोग करणेबाबत पाहणी करण्यात येणार आहे.

सदर सादरीकरणामध्ये वाहनतळ विकसित करण्यापूर्वी तेथील वाहतुकीची प्रत्यक्ष वर्दळ, वाहनतळाच्या जागेची रचना आणि उपलब्धता तसेच विद्यमान स्थितीत त्या परिसरात वाहने उभी करण्यासाठी वापरली जाणारी पध्दती अशा विविध बाबींचा अभ्यासपूर्ण अहवाल मांडण्यात आला.

याप्रसंगी अतिरिक्त आयुक्त विजयकुमार म्हसाळ, शहर अभियंता संजय देसाई, मुख्य लेखा-वित्त अधिकारी सत्यवान उबाळे, मुख्य लेखा परीक्षक जितेंद्र इंगळे, मालमत्ता विभागाचे उपायुक्त डॉ. राहुल गेठे, सहाय्यक संचालक नगररचना सोमनाथ केकाण, कार्यकारी अभियंता अरविंद शिंदे आणि संबंधित अधिकारी उपस्थित होते. सद्यस्थितीत वाहनांचे प्रमाण मोठ्या संख्येने वाढले असून सर्वच शहरांसमोर गाड्यांच्या पार्किंगची बिकट समस्या उभी असल्याचे आढळून येते.

नवी मुंबई शहरातही वाहने उभी करण्याची समस्या असून ती दूर करण्यासाठी महापालिका आयुक्त राजेश नार्वेकर बारकाईने लक्ष देत आहेत. महापालिकेचे संबंधित विभाग तसेच वाहतूक पोलीस विभाग आणि प्रादेशिक परिवहन विभाग यांच्यासमवेत नियमित आढावा बैठकांचे आयोजन करून या कामाला गती देत आहेत.

दोन्ही वाहनतळ उपयोगी

सद्यस्थितीत सदर भाग कार्यालये आणि इतर व्यावसायिक गोष्टीने गजबजलेला असल्याने वाहने उभी करण्यासठी रस्त्यांच्या दोन्हीकडील बाजूंचा वापर केला जात असल्याचे निदर्शनास येत आहे. त्यामुळे रस्त्याची रुंदी कमी होऊन वाहतुकीला बऱ्याच ठिकाणी अडचण निर्माण होत आहे. यावर उपाययोजनेच्या दृष्टीने दोन्ही वाहनतळ उपयोगी ठरणार आहेत. वाहनतळाचे नियोजन करताना विद्यमान वाहनांच्या वाहतुकीचा विचार करण्यासोबतच या भागाचा आगामी कालावधीत होणारा विकास आणि त्यामुळे वाढणाऱ्या संभाव्य वाहनांचाही विचार करण्याच्या सूचना आयुक्त नार्वेकर यांनी दिल्या आहेत.

शासन आणि खासगी संस्था भागीदारी तत्त्वावर वाहनतळ विकसित केल्यास महापालिकेला आपला निधी यामध्ये गुंतवावा लागणार नाही, शिवाय महापालिकेला महसूलही प्राप्त होईल. या वाहनतळांचे दर नागरिकांना परवडणारे असावेत, याचाही विचार करून सद्यस्थितीत महापालिकामार्फत विविध ठिकाणी वाहनतळासाठी निश्चित केलेले दर यांचा तौलनिक अभ्यास करावा. शहरातील इतर भागांमध्येही वाहनतळ विकसित करण्यासाठी नियोजन करतानाच सर्वेक्षण करून त्याचा अहवाल जलद सादर करावा. -राजेश नार्वेकर, आयुक्त नवी मुंबई महापालिका

logo
marathi.freepressjournal.in