नवी मुंबई : स्वर्गीय रामचंद्र नाईक प्रतिष्ठानतर्फे अयोध्या येथील श्री राम मंदिर प्रतिष्ठापनेनिमित्त नवी मुंबईमध्ये विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले असून रामभक्तांना प्रभू रामाच्या जयघोषामध्ये ५० हजार किलो म्हणजेच दोन लाख लाडूचे राम प्रसाद म्हणून वाटण्यात आले. रामपताका आणि दीपोत्सवासाठी दिव्यांचे वाटप करण्यात आले.
कोपरखैरणे येथील रा. फ. नाईक विद्यालयाचा मैदान परिसर श्रीराम गीतांनी भक्तिमय बनला होता. सर्वत्र रामपताका डौलाने फडकत होत्या. माजी खासदार संजीव नाईक, माजी आमदार संदीप नाईक यांच्यासह रामभक्त मोठ्या संख्येने उपस्थित होते. संजीव नाईक आणि संदीप नाईक यांनी आपल्या सहकाऱ्यांसह प्रसादाचे लाडू वळण्याचे सेवाकार्य यावेळी केले. श्री राम मंदिर प्रतिष्ठापनेनिमित्त स्वर्गीय रामचंद्र नाईक प्रतिष्ठानतर्फे कोपरखैरणे येथील रा. फ. नाईक विद्यालयाच्या पटांगणावर श्री रामाची ३६०० चौरस फुटांची महारांगोळी साकारण्यात आली आहे. या रांगोळीसाठी तब्बल ७५० किलो विविध रंगांच्या रांगोळीचा वापर करण्यात आला आहे. सोमवार, २२ जानेवारी रोजी ही महारांगोळी सर्वांना पाहण्यासाठी खुली राहणार आहे.