आश्रमातील अल्पवयीन मुलींचे लैंगिक शोषण

येसुदासन विरोधात या प्रकरणात विनयभंग आणि पोक्सो कलमानुसार चार गुन्हे दाखल झाले आहेत
आश्रमातील अल्पवयीन मुलींचे लैंगिक शोषण

सीवूड्स येथील बेथेल गॉस्पेल या चर्चमध्ये बेकायदेशीररीत्या आश्रमशाळा चालविणाऱ्या पास्टर (केअरटेकर) राजकुमार येसुदासन याने आश्रमशाळेतील आणखी तीन मुलींचे लैंगिक शोषण केल्याचे उघडकीस आले आहे. या आश्रमशाळेतून सुटका करण्यात आलेल्या इतर तीन मुलींनी याबाबतची माहिती दिल्यानंतर ठाणे जिल्हा महिला व बाल कल्याण विभागाने राजकुमार येसुदासन याच्या विरोधात अल्पवयीन मुलींचे लैंगिक शोषण केल्याप्रकरणी आणखी तीन स्वतंत्र गुन्हे दाखल केले आहेत.

येसुदासन विरोधात या प्रकरणात विनयभंग आणि पोक्सो कलमानुसार चार गुन्हे दाखल झाले आहेत. यावरुन आश्रम शाळेत कुणाचेही लैंगिक शोषण झाले नाही, अशी पत्रकार परिषद घेऊन सांगणाऱ्या एआरके फाऊंडेशनचा दावा फोल ठरला आहे.

सीवूड्स येथील बेथेल गॉस्पेल या चर्चमध्ये बेकायदेशीररीत्या सुरू असलेल्या आश्रमशाळेत अल्पवयीन मुलामुलींचे तेथील पास्टरकडून छळ करण्यात येत असल्याची माहिती मिळाल्यानंतर ठाणे जिल्हा महिला व बाल कल्याण विभागाने गत ५ ऑगस्ट रोजी येथील चर्चवर कारवाइ केली होती. तसेच तेथील अस्वच्छ व गलिच्छ वातावरणात ठेवण्यात आलेल्या ४५ मुलामुलींची सुटका केली होती. तसेच त्यांना उल्हासनगर येथील बालगृहात ठेवण्यात आले होते. महिला व बाल कल्याण विभागाकडून सुटका करण्यात आलेल्या या मुलामुलींकडे केलेल्या चौकशीनंतर चर्चमधील पास्टर राजकुमार येसुदासन हा आश्रममधील मुलींचे लैगिक शोषण करत असल्याची बाब समोर आली होती.

त्यानंतर एनआरआय पोलिसांनी सुटका करण्यात आलेल्या १४ वर्षीय मुलीने दिलेल्या माहितीच्या आधारे तसेच महिला व बाल कल्याण विभागाने केलेल्या तक्रारीवरुन राजकुमार येसुदासन याच्यावर विनयभंगासह पोक्सो कलमाखाली गुन्हा दाखल करुन त्याला अटक केली आहे. सध्या येसुदासन हा न्यायालयीन कोठडीत आहे.

Related Stories

No stories found.
logo
marathi.freepressjournal.in