नवी मुंबईतील शिवसेनेच्या गवते दाम्पत्याचा भाजपामध्ये प्रवेश

आमदार गणेश नाईक यांच्या उपस्थितीत त्यांनी हा प्रवेश करत त्यांच्यासोबत शेकडो शिवसैनिकांनी देखील भाजप मध्ये प्रवेश
नवी मुंबईतील शिवसेनेच्या गवते दाम्पत्याचा भाजपामध्ये प्रवेश

नवी मुंबईतील माजी स्थायी समिती सभापती आणि दिघा येथील माजी दबंग नगरसेवक नवीन गवते व माजी नगरसेविका अपर्णा गवते यांनी मंगळवारी १९ जुलै रोजी शिवसेनेला राम राम ठोकत भाजपामध्ये प्रवेश केला. आमदार गणेश नाईक यांच्या उपस्थितीत त्यांनी हा प्रवेश करत त्यांच्यासोबत शेकडो शिवसैनिकांनी देखील भाजप मध्ये प्रवेश केला आहे. दरम्यान, राज्यातील राजकारण पाहता शिवसेनेतून शिंदे गटात प्रवेश करणाऱ्या पदाधिकारी, कार्यकर्त्यांचे प्रमाण जास्त असताना नवी मुंबईत मात्र गवते यांनी शिंदे गटाला देखील धक्का देत भाजपामध्ये प्रवेश केल्याने चर्चांना उधाण आले आहे.

दरम्यान, या प्रवेशाबाबत बोलताना नवीन गवते यांनी सांगितले की, आमदार गणेश नाईक यांच्या माध्यमातून दिघ्यातील अनधिकृत बांधकामे यांसह पाणी प्रश्न सारखे असंख्य प्रश्न मार्गी लागतील हा विश्वास व्यक्त केला आहे. तर गवते मनाने कधीच शिवसेनेत नव्हते. दिघ्याचा विकासासाठी त्यावेळच्या महविकासआघडी सरकार असताना त्यांनी शिवसेनेत प्रवेश केला होता. मात्र अनेक प्रश्न सोडवण्यासाठी त्यांना अडचणी येत होत्या. अखेर राज्यातील सरकार आणि सुरू असलेले राजकारण पाहता गवते यांनी घरवापसीचा निर्णय घेतल्याचे आमदार गणेश नाईक यांनी सांगितले. तर येणाऱ्या काळात नवी मुंबईतील, दिघ्यातील असंख्य प्रश्न मार्गी लावण्यासाठी मी स्वतः प्रयत्नशील राहणार असल्याचे आमदार गणेश नाईक यांनी सांगत गवते दांपत्याचे घरवापसी बद्दल स्वागत केले. याप्रसंगी माजी नगरसेवक नवीन गवते, पत्नी अपर्णा गवते आणि दीपा गवते यांच्यासह शेकडो कार्यकर्त्यानी भाजपाचा झेंडा हाती घेतला.

Related Stories

No stories found.
logo
marathi.freepressjournal.in