

नवी मुंबई : नेरूळ येथील छत्रपती शिवाजी महाराज चौकातील महाराजांच्या सिंहासनारूढ पुतळ्याचे अधिकृत अनावरण अखेर निश्चित झाले आहे. अनेक महिन्यांच्या विलंबानंतर आणि गेल्या आठवड्यात उभ्या झालेल्या राजकीय वादानंतर हा कार्यक्रम आज सायंकाळी ५ वाजता उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि वनमंत्री गणेश नाईक यांच्या उपस्थितीत पार पडणार असल्याची माहिती नवी मुंबई महानगरपालिकेने प्रसिद्धीपत्रकाद्वारे दिली.
गेल्या रविवारी मनसेचे नेते अमित ठाकरे यांनी परवानगीशिवाय पुतळ्याचे अनावरण केल्याने शहरात मोठी खळबळ उडाली होती. महापालिकेने हा सोहळा अनधिकृत ठरवला असून नेरूळ पोलिसांनी जमावबंदीचे उल्लंघन व परवानगीशिवाय कार्यक्रम केल्याप्रकरणी अमित ठाकरे यांच्यासह ७० मनसैनिकांवर गुन्हा दाखल केला होता. या घडामोडींनंतर स्मारकाभोवती राजकीय आरोप-प्रत्यारोप रंगले.
गुरुवारी राष्ट्रवादी (शरद पवार गट) कार्यकर्त्यांनी पालिकेत घुसून स्मारक जनतेसाठी तत्काळ खुलं करण्याची मागणी करत आंदोलन केले. तर मनसेने उद्घाटन भाजप-शिवसेना श्रेयवादामुळे रखडल्याचा आरोप केला होता. महापालिका प्रशासनाने पुतळ्याभोवतीची कामे अपूर्ण असल्यामुळे उद्घाटन लांबल्याचे कारण दिले होते. सर्व कामे पूर्ण झाल्यानंतर आता कार्यक्रम निश्चित केल्याची माहिती प्रशासनाने दिली आहे.
उद्घाटन कार्यक्रमात उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासह वनमंत्री गणेश नाईक, खासदार नरेश म्हस्के, खासदार डॉ. श्रीकांत शिंदे, आमदार मंदा म्हात्रे यांच्यासह सामाजिक संघटनांचे प्रतिनिधी व शिवप्रेमीमोठ्या संख्येने उपस्थित राहणार आहेत. दीर्घ प्रतीक्षेनंतर स्मारकाचे अधिकृत अनावरण होत असल्याने नेरुळ परिसरात शिवप्रेमी आणि स्थानिक नागरिकांमध्ये उत्साहाचे वातावरण पाहायला मिळत आहे.
नागरिकांमध्ये नाराजी
नेरूळ शिवरायांच्या सिंहासनारुढ पुतळ्याचे सौंदर्यीकरण झाल्याने परिसराचा देखावा बदलला असला तरी पुतळा अनावरणासाठी अधिकृत कार्यक्रम न ठरल्याने नागरिकांमध्ये नाराजी व्यक्त केली जात आहे. चौकाचे सौंदर्यीकरण + मावळ्यांचा देखावा यासाठी १.०६ कोटींपेक्षा अधिक खर्च करण्यात आला आहे तसेच शिवरायांचा सिंहासनारुढ पुतळा निर्मितीचा खर्च ४६ लाखांपेक्षा अधिक आहे.