आरोग्य विभागात सफाई कर्मचाऱ्यांची कमतरता; पालिकेच्या प्रामाणिक कर्मचाऱ्यांवर अतिरिक्त ताण

भिवंडी महानगरपालिकेच्या आरोग्य विभागात एकूण १५८२ कामगार असून, त्यापैकी १५ ते २० टक्के कामगार नेहमी गैरहजर असतात.
आरोग्य विभागात सफाई कर्मचाऱ्यांची कमतरता; पालिकेच्या प्रामाणिक कर्मचाऱ्यांवर अतिरिक्त ताण
PM

भिवंडी : भिवंडी महानगरपालिकेच्या आरोग्य विभागात सफाई कर्मचारी कमी असल्याने आणि मनपाच्या आरोग्य विभागात असलेल्या काही कामगारांच्या गैरहजेरीमुळे अतिरिक्त नियमित व प्रामाणिक कामगारांवर कामाचा ताण येत आहे. मागील आठवड्यात कामावर असलेल्या एका सफाई कर्मचाऱ्याची अचानक तब्येत बिघडून त्याचा मृत्यू झाला; तर एक महिला चक्कर येऊन आजारी झाली. त्यामुळे नित्याने प्रामाणिकपणे काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांचा व त्यांच्या आरोग्याचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. यासाठी महानगरपालिकेत असलेल्या सफाई कर्मचाऱ्यांचे नियमन व नियोजन करून अपेक्षित सफाई कर्मचाऱ्यांची भरती करण्याची मागणी वाढू लागली आहे.

भिवंडी महानगरपालिकेच्या आरोग्य विभागात एकूण १५८२ कामगार असून, त्यापैकी १५ ते २० टक्के कामगार नेहमी गैरहजर असतात. पालिकेच्या कार्यक्षेत्रात आरोग्य विभागाच्या एकूण २३ कॅबिन असून, त्यामध्ये २३ कॅबिन प्रमुख म्हणून २३ प्रभारी आरोग्य निरीक्षक म्हणून कार्यरत आहेत. या सर्व आरोग्य निरीक्षकांच्या बदल्या वेळेवर होत नसल्याने कॅबिनच्या कारभारात बजबजपुरी माजली आहे. या कॅबिन पैकी काही मान्यवर लोकप्रतिनिधीच्या रहिवासी क्षेत्रात असलेल्या कॅबिनमध्ये त्यांच्या मर्जीतील कामगार कॅबिनमध्ये केवळ हजेरी लावण्यासाठी येतात. तर अनेकवेळा गैरहजर राहतात. मनपा आयुक्त अथवा उपायुक्तांच्या अचानक कॅबिन भेटीमध्ये अनेक कामगार नेहमी गैरहजर असलेले आढळून आलेले आहे. त्यांच्यावर मनपा अधिनियमानुसार कारवाई देखील केली जाते परंतु पुन्हा जैसे थे परिस्थिती होते.

कर्मचाऱ्यांची तूट भरून निघत नाही

त्याचप्रमाणे गेल्या एक-दीड वर्षात भिवंडी महानगरपालिकेच्या आरोग्य विभागातील सुमारे १०० पेक्षा जास्त कामगार सेवानिवृत्त अथवा मयत झाले आहेत. त्यांचे वारस सफाई कर्मचारी म्हणून काम करीत नसल्याने आरोग्य विभागातील कर्मचाऱ्यांची तूट भरून निघत नाही. याप्रमाणे मोजणी केली, तर गेल्या पाच वर्षांचा आकडा मोठा झाला आहे. तर काही सफाई कर्मचारी मनपाच्या विविध आस्थापनेवर प्रभारी लिपिक अथवा अधिकारी म्हणून काम करीत आहेत. तर काही कर्मचारी ना सफाईचे काम करत नाहीत की, कार्यालयात काम करीत नाहीत. काही सफाई कर्मचाऱ्यांची उच्च न्यायालय आणि सर्वोच्च न्यायालयात दावे आहेत. या सर्व कारणांमुळे पालिकेचा आरोग्य विभाग सफाई कर्मचाऱ्यांच्या कमतरतेमुळे नेहमी गाजत असतो.

नियमित गैरहजर राहणाऱ्यांवर कारवाई व्हावी

याबाबत महानगरपालिकेच्या आस्थापना अधिकाऱ्यांनी नियमित लक्ष घालून कॅबिनमधील आरोग्य निरीक्षकास जाब विचारणे जरुरीचे बनले आहे. दिवसेंदिवस आरोग्य विभागात होणाऱ्या सफाई कामगारांच्या कमतरतेचा अथवा गैरहजेरीचा परिणाम इतर प्रामाणिकपणे काम करणाऱ्या सफाई कर्मचाऱ्यांच्या आरोग्यावर होऊ लागला आहे. अशा नियमित काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांवर ताण येऊ लागला आहे. याबाबत कामगार संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी पुढाकार घेऊन नियमित गैरहजर राहणाऱ्या अथवा कामचुकारपणा करणाऱ्या सफाई कर्मचाऱ्यांना पाठीशी न घालता त्यांना देखील पालिकेच्या सफाई कामात पुढाकार घेण्यास सांगितले पाहिजे. महापालिकेच्या सफाई कर्मचाऱ्यांच्या हक्कासाठी लढणाऱ्या कामगार संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी वेळोवेळी महानगरपालिकेच्या आयुक्तांना निवेदन देऊन कामगाराच्या सोयीसाठी मागण्या केल्या आहेत.

भिवंडी महानगरपालिकेतील सफाई कर्मचारी निवृत्त अथवा मयत झाल्यास त्यांचे वारस अनुकंपा भरतीने सफाई विभागात काम न करता ते पालिकेच्या इतर आस्थापनेवर काम करीत आहेत. त्यामुळे सफाई विभागात सफाई कामगारांची कमतरता वाढत आहे, तर कोर्टाच्या दाव्यातील कामगार सफाईचे काम करीत नाहीत. त्यामुळे सफाई कर्मचाऱ्यांची ही तूट भरून काढण्यासाठी महानगरपालिकेच्या लोकसंख्येनुसार सफाई कर्मचाऱ्यांची भरती करणे ही काळाची गरज आहे.

- फैजल तातली, भिवंडी महापालिका सहा. आयुक्त ,आरोग्य विभाग

logo
marathi.freepressjournal.in