उरण तालुक्यात ‘लालकंठी तीरचिमणी’चे दर्शन; रायगड जिल्ह्यात पहिल्यांदा आढळून आल्याची नोंद

रशियात वीण करणारा लालकंठी तीरचिमणी हा पक्षी प्रामुख्याने आफ्रिका आणि दक्षिण- उत्तर आशियात स्थलांतर करत असल्याचे निदर्शनास येत असते. मात्र यंदा हा पक्षी रायगडमध्ये पहिल्यांदाच आढळून आल्याने पक्षीप्रेमींसाठी ही एक पर्वणीच ठरत आहे.
उरण तालुक्यात ‘लालकंठी तीरचिमणी’चे दर्शन
उरण तालुक्यात ‘लालकंठी तीरचिमणी’चे दर्शन
Published on

राजकुमार भगत/उरण

रशियात वीण करणारा लालकंठी तीरचिमणी हा पक्षी प्रामुख्याने आफ्रिका आणि दक्षिण- उत्तर आशियात स्थलांतर करत असल्याचे निदर्शनास येत असते. मात्र यंदा हा पक्षी रायगडमध्ये पहिल्यांदाच आढळून आल्याने पक्षीप्रेमींसाठी ही एक पर्वणीच ठरत आहे. उरण तालुक्यातील नवघर गावाजवळच्या क्रिकेटच्या मैदानावर हे दोन लालकंठी तीरचिमण्या जोडीने गवतावर वावरत असल्याचे पक्षी निरीक्षक वैभव पाटील यांना आढळून आले.

नियमित महाराष्ट्रात आढळून येत नसल्याने ‘लालकंठी तीरचिमणी’ हा महाराष्ट्रासाठी भटका प्रवासी पक्षी म्हणून त्याची नोंद आहे. प्रवासातून भरकटत असल्यामुळे तो महाराष्ट्रात येत असण्याची शक्यता वर्तवली जात आहे. राज्यात यापूर्वी पुणे, पालघर आणि अकोला जिल्ह्यात याच्या मोजक्याच नोंदी सापडतात. पण पुण्यातील टाटा धरणावर याच्या सातत्याने नोंदी सापडतात.

‘लालकंठी तीरचिमणी’ म्हणजेच ‘Red-throated Pipit’ हा पक्षी रायगड जिल्ह्यात पहिल्यांदाच आढळून आला असून, उरण तालुक्यातील नवघर गावाजवळच्या क्रिकेटच्या मैदानावर हा पक्षी जोडीने वावरत असल्याची नोंद करण्यात आलेली आहे. पक्षी निरीक्षक वैभव पाटील यांनी ही नोंद केलेली आहे. रशियात वीण करणारा हा पक्षी प्रामुख्याने आफ्रिका आणि दक्षिण- उत्तर आशियात स्थलांतर करत असतो.

भारतात अंदमान निकोबार येथे याच्या दरवर्षीच्या नियमित नोंदी सापडतात. गवताळ भागात आधिवास करणारा हा पक्षी युरोपच्या उत्तरेकडील भागात प्रजनन करून हिवाळी हंगामात तिथून स्थलांतर करतो. प्रामुख्याने आफ्रिका, दक्षिण आणि पूर्व आशियापासून अमेरिकेच्या पश्चिम किनारपट्टीपर्यंत प्रवास करतो. भारतातील अंदमान निकोबार बेटांवर देखील हा पक्षी आढळतो. महाराष्ट्रासाठी अतिशय दुर्मिळ असलेला या पक्षाची रायगड जिल्ह्यात झालेली ही नोंद पक्षी निरीक्षकांमध्ये उत्साह निर्माण करणारी ठरलेली आहे.

अनेक पक्षी निरीक्षक व छायाचित्रकार लालकंठी तीरचिमणी पाहण्यासाठी व त्याला छायाचीत्रित करण्यासाठी नवघरची वाट धरत आहेत.

logo
marathi.freepressjournal.in