आर्थिक गर्तेतून सिडकोला बाहेर काढण्याचे सिंघल यांच्यापुढे आव्हान; जुनेच प्रकल्प पूर्णत्वास नेण्याची जबाबदारी

दुसरीकडे प्रकल्प नियोजनातील त्रुटींमुळे सिडकोच्या तिजोरीवर देखील परिणाम झाला आहे. काही वर्षांपूर्वी १५ हजार कोटींची गंगाजळी सिडकोच्या मुदतठेवीमध्ये होती. परंतु, गत ५ वर्षांत घेतलेल्या काही चुकीच्या निर्णयांमुळे आजही गंगाजळी ५ हजार कोटींपेक्षाही कमी झाली आहे.
आर्थिक गर्तेतून सिडकोला बाहेर काढण्याचे सिंघल यांच्यापुढे आव्हान; जुनेच प्रकल्प पूर्णत्वास नेण्याची जबाबदारी

नवी मुंबई : शहरांचे शिल्पकार म्हणून बिरुदावली लावणाऱ्या सिडको महामंडळाला ५४ वर्षे पूर्ण झाली आहेत. गत १३ वर्षांपासून या महामंडळाने हाती घेतलेले हजारो कोटी रुपयांचे अनेक विकास प्रकल्प संथगतीने सुरू आहेत. परिणामी वर्षानुवर्षे सुरू असलेले नैना, मेट्रो, विमानतळ, कॉर्पोरेट पार्क, गृहनिर्माण आदी महत्त्वाकांक्षी प्रकल्प मार्गी लावण्यात पाहिजे तसे यश सिडको व्यवस्थापनाला आलेले नाही.

दुसरीकडे प्रकल्प नियोजनातील त्रुटींमुळे सिडकोच्या तिजोरीवर देखील परिणाम झाला आहे. काही वर्षांपूर्वी १५ हजार कोटींची गंगाजळी सिडकोच्या मुदतठेवीमध्ये होती. परंतु, गत ५ वर्षांत घेतलेल्या काही चुकीच्या निर्णयांमुळे आजही गंगाजळी ५ हजार कोटींपेक्षाही कमी झाली आहे. शिवाय सिडकोला कर्ज घ्यावे लागले ते वेगळेच. अशा परिस्थितीत नुकतीच सिडकोची धुरा राज्य शासनाने विजय सिंघल यांच्यावर सोपविली आहे. त्यामुळे आर्थिक परिस्थिती कमकुवत झालेल्या सिडकोच्या महत्त्वाकांक्षी प्रकल्पांना गती देऊन ते पूर्णत्वास नेण्याची जबाबदारी नव्या व्यवस्थापकीय संचालकांवर येऊन पडली आहे.

सिडकोचा महत्त्वाकांक्षी नवी मुंबई विमानतळ प्रकल्प आता सुधारित वेळापत्रकानुसार मार्च २०२५ पर्यंत काय्रान्वित करणे, नैना प्रकल्पातील मंजूर झालेल्या नगररचना परियोजनांची (टीपी स्कीम) प्रत्यक्ष अंमलबजावणी करणे व पायाभूत सुविधांची निर्मिती करणे, ज्यांच्या जमिनीवर सिडकोने श्रीमंतीचे इमले बांधले आहेत. त्या प्रकल्पग्रस्तांना साडेबारा टक्के योजनेअंतर्गत भूखंड वाटप करुन ३४ वर्षांपासून सुरू असलेली ही योजना पूर्णत्वास नेणे व सिडकोद्वारा उभारण्यात येणाऱया ४१ हजार घरांची विहित वेळेत विक्री करण्याची मोठी जबाबदारी विजय सिंघल यांच्या खांद्यावर असणार आहे. याशिवाय कोंढाणे धरणाची उभारणी, खारघर येथील कॉर्पोरेट पार्कची निर्मिती, तुर्भे-खारघर बोगद्याची निर्मिती आदी प्रकल्प मार्गी लावण्याचे आव्हान सिंघल यांच्यासमोर असणार आहे.

खारघर-तुर्भे टनेल रोड चार वर्षांत पूर्ण करण्याचे आव्हान

खारघर येथे निर्माण होत असलेल्या इंटरनॅशनल कॉरपोरेट पार्क (आयसीपी) ला थेट जोडण्यासाठी खारघर-तुर्भे टनेल रोड (केटीएलआर) ची उभारणी सिडकोद्वारा केली जात आहे. सिडको या प्रकल्पावर आकस्मिक खर्चासह तब्बल ३१६६ कोटी ७८ लाख रुपये खर्च करणार असून केटीएलआर प्रकल्प आगामी चार वर्षांत पूर्ण करण्याचे आव्हान सिडकोसमोर आहे.

नैनाचे भिजत घोंगडे : नैना प्रकल्पाच्या पहिल्या टप्प्यामध्ये विकसित होणाऱ्या २३ गावांचा विकास १२ नगररचना परियोजनेच्या (टीपी स्कीम) माध्यमातून सिडको करणार आहे. यापैकी पहिल्या तीन नगररचना परियोजनेला शासनाची मंजुरी मिळाली आहे. तर, अन्य तीन परियोजना जाहीर करण्यात आल्या आहेत. मात्र आजतागायत एकही टीपी स्कीम पुर्णत प्रत्यक्ष अंमलात येऊ शकलेली नाही. त्यामुळे गत ११ वर्षांपासून नैना क्षेत्राचा विकास रखडलेला आहे. प्रत्येक वर्षी शासन येथील शेतकऱ्यांना व विकासकांना नवीन नवीन योजनांचे गाजर दाखवून या क्षेत्राचा विकास करण्याचे आश्वासन देत आहे. त्यामुळे सिडकोने नगररचना परियोजनेची अंमलबजावणी तत्काळ सुरू न केल्यास नैनाच्या विकासाला ब्रेक लागण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

कॉर्पोरेट पार्क : नवी मुंबईतील खारघर येथे १५० हेक्टर क्षेत्रावर सिडकोतर्फे कॉर्पोरेट पार्क प्रकल्प साकारण्यात येणार आहे. मुख्यतः वाणिज्यिक व अंशतः निवासी वापर असणारे आर्थिक केंद्र असे या प्रकल्पाचे वर्णन करता येईल. नवी मुंबई शहराची वाणिज्यिक क्षमता मोठ्या प्रमाणावर वृद्धिंगत करणे, हा कॉर्पोरेट पार्कच्या निर्मितीमागील प्रमुख उद्देश आहे. कॉर्पोरेट्‌स, वित्तीय संस्था, माहिती तंत्रज्ञान आणि माहिती तंत्रज्ञान सक्षम सेवा, आतिथ्य, वैद्यकीय सेवा, किरकोळ व्यवसाय आणि निवासी संकुले इत्यादी क्षेत्रांना आकर्षित करण्यासाठी आंतरराष्ट्रीय दर्जाचे कॉर्पोरेट पार्क अत्याधुनिक स्मार्ट सिटी प्रकल्प म्हणून विकसित करण्याचे आव्हान विजय सिंघल यांच्यासमोर आहे.

विमानतळाच्या प्रतीक्षेत नवी मुंबईकर

नवी मुंबई विमानतळ प्रकल्प हा सिडकोसह राज्याचा महत्त्वाकांक्षी विकास प्रकल्प आहे. आगामी लोकसभा निवडणुका डोळ्यासमोर ठेवून नवी मुंबईतून विमानोड्डाण लवकरात लवकर होण्यासाठी महाराष्ट्र शासन व सिडको प्रयत्नशील आहे; मात्र डिसेंबर २०२४च्या डेडलाईनऐवजी आता या विमानतळाची उभारणी करणाऱ्या नवी मुंबई इंटरनॅशनल एअरपोर्ट प्रा. लि. या कंपनीला मार्च २०२५ पर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे. त्यामुळे ही डेडलाईन पाळण्यासाठी सिडको व्यवस्थापन विमानतळ उभारणाऱ्या कंपनीसोबत रात्रंदिवस झटत आहेत. त्यामुळे आपल्या कार्यकाळात नवी मुंबईतून विमानोड्डाण सुरू करण्याची संधी सिडकोचे विद्यमान व्यवस्थापकीय संचालक विजय सिंघल यांना प्राप्त झाली आहे.

Related Stories

No stories found.
logo
marathi.freepressjournal.in