नवी मुंबईतील झोपडपट्टी सर्वेक्षणाचा मार्ग मोकळा; मुख्यमंत्र्यांच्या आश्वासनानंतर विजय चौगुले यांचे आंदोलन स्थगित

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी ५ ऑगस्टपासून झोपडपट्टी सर्वेक्षण सुरू करण्याची ग्वाही दिल्यामुळे चौगुले यांनी खासदार म्हस्के यांच्याहस्ते ज्यूस पिऊन उपोषण आंदोलन स्थगित केले.
नवी मुंबईतील झोपडपट्टी सर्वेक्षणाचा मार्ग मोकळा; मुख्यमंत्र्यांच्या आश्वासनानंतर विजय चौगुले यांचे आंदोलन स्थगित
Published on

नवी मुंबई : नवी मुंबईत झोपडपट्टी पुनर्वसन प्राधिकरण अंतर्गत बायोमेट्रिक सर्वेक्षणाला सुरुवात करावी तसेच नवी मुंबईतील प्रकल्पग्रस्तांनी गरजेपोटी बांधलेली घरे कायमस्वरुपी करण्याच्या निणर्याची अंमलबजावणी करावी याकरिता शिवसेना नवी मुंबई जिल्हाप्रमुख विजय चौगुले यांनी १ ऑगस्टपासून सुरू केलेले बेमुदत आमरण उपोषण खासदार नरश म्हस्के यांच्या मध्यस्थीनंतर ३ ऑगस्ट रोजी सोडण्यात आले. यासंदर्भात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी ५ ऑगस्टपासून झोपडपट्टी सर्वेक्षण सुरू करण्याची ग्वाही दिल्यामुळे चौगुले यांनी खासदार म्हस्के यांच्याहस्ते ज्यूस पिऊन उपोषण आंदोलन स्थगित केले.

नवी मुंबईत झोपडपट्टी पुनर्वसन प्राधिकरण अंतर्गत बायोमेट्रिक सर्वेक्षण सुरू करावे तसेच नवी मुंबईतील प्रकल्पग्रस्तांची गरजेपोटी बांधलेली घरे कायमस्वरुपी करण्याबाबत निर्णयाची अंमलबजावणी करावी यासाठी शिवसेना जिल्हाप्रमुख विजय चौगुले यांनी १ ऑगस्टपासून ऐरोलीतील चिंचपाडा येथे आमरण उपोषण आंदोलन सुरू केले होते. विजय चौगुले यांच्या उपोषणाच्या समर्थनार्थ ३ ऑगस्ट रोजी ऐरोली बंदची हाक देण्यात आली होती. त्यामुळे ऐरोली, दिघा, रबाले येथे बंद पाळण्यात आला. येथील दुकाने देखील दुपारपर्यंत बंद होती.

३ ऑगस्ट रोजी विजय चौगुले यांनी पुकारलेल्या उपोषणाचा तिसरा दिवस होता. उपोषणामुळे त्यांची प्रकृतीही चिंताजनक झाली होती. त्यामुळे डॉक्टरांनी चौगुले यांना उपचाराचा सल्ला दिला होता. परंतु, चौगुले यांनी वैद्यकीय उपचारास नकार दिला होता. चौगुले यांच्या आरोग्याबाबत त्यांचे समर्थक आणि झोपडपट्टीवासीयांमध्ये चिंतेचे वातावरण होते. त्या अनुषंगाने ऐरोली, दिघा, रबाळेमधील व्यापाऱ्यांनी चौगुले यांच्या उपोषणास पाठिंबा दर्शविण्यासाठी बंदची हाक दिली होती. अखेरीस ३ ऑगस्ट रोजी उपोषणस्थळी येत खासदार नरेश म्हस्के यांच्या शिष्टाईनंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी ५ ऑगस्टपासून झोपडपट्टी सर्वेक्षण सुरू करण्याचे आश्वासन दिले. त्यामुळे विजय चौगुले यांनी त्यांचे उपोषण सोडले.

logo
marathi.freepressjournal.in