स्मगलिंगच्या केसमध्ये अडकवण्याची भीती दाखवून ८० लाखांना गंडा; अज्ञात सायबर टोळीचा पोलिसांकडून शोध सुरू

६३ वर्षीय सेवानिवृत्त व्यक्तीला त्यांच्या नावाने आलेल्या पार्सलमध्ये स्मगलिंगचे साहित्य असल्याचे सांगून सदर प्रकरणात त्यांना अटक करण्याची भिती दाखवून त्यांच्याकडून तब्बल ८० लाख रुपये उकळल्याचा प्रकार उघडकीस आला आहे.
स्मगलिंगच्या केसमध्ये अडकवण्याची भीती दाखवून ८० लाखांना गंडा; अज्ञात सायबर टोळीचा पोलिसांकडून शोध सुरू

नवी मुंबई : सायबर क्राइमचे पोलीस, आरबीआय, ईडी व फायनान्स मिनीस्ट्रीचे अधिकारी असल्याचे भासवून एका सायबर टोळीने वाशीमध्ये राहणाऱ्या एका ६३ वर्षीय सेवानिवृत्त व्यक्तीला त्यांच्या नावाने आलेल्या पार्सलमध्ये स्मगलिंगचे साहित्य असल्याचे सांगून सदर प्रकरणात त्यांना अटक करण्याची भिती दाखवून त्यांच्याकडून तब्बल ८० लाख रुपये उकळल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. नवी मुंबईच्या सायबर पोलिसांनी या प्रकरणातील सायबर टोळीविरोधात फसवणुकीसह बनावटगिरी तसेच आयटी ॲक्टनुसार गुन्हा दाखल करून या टोळीचा शोध सरू केला आहे.

या प्रकरणात फसवणूक झालेले ज्येष्ठ नागरिक वाशी सेक्टर-२९ मध्ये राहण्यास असून गत आठवड्यामध्ये या व्यक्तीला सायबर टोळीने फेडेक्स पार्सल डिलिव्हरी कंपनीमधून बोलत असल्याचे भासवून संपर्क साधला होता.

तसेच त्यांच्या नावाने त्यांच्याकडे आलेल्या पार्सलमध्ये स्मगलिंगचे साहित्य आढळून आल्यामुळे त्याबाबत सायबर क्राइम पोलिसांकडे त्यांची तक्रार करण्यात आल्याचे सांगून त्यांना भीती घातली होती. त्यानंतर सायबर टोळीतील इतर गुन्हेगारांनी सायबर क्राइम विभागाकडून बोलत असल्याचे भासवून स्काईप ॲपद्वारे या ज्येष्ठ नागरिकाला संपर्क साधला. त्यानंतर सायबर टोळीने या ज्येष्ठ नागरिकाला आरबीआय, ईडी व फायनान्स मिनीस्ट्रीचे बनावट पत्र पाठवून त्यांच्यावर पोलीस कारवाई करण्याची व त्यात त्यांना अटक करण्याची धमकी दिली.

या कारवाईपासून वाचण्यासाठी तसेच त्यांना मदत करण्याच्या बहाण्याने त्यांची संपत्ती व्हेरीफिकेशन करण्याच्या नावाखाली त्यांना वेगवेगळ्या बँक खात्यात पैसे पाठवण्यास भाग पाडले. तसेच त्यांच्याकडून टप्प्याटप्प्याने एकूण ८० लाख रुपये उकळले. त्यानंतर या टोळीने आपले मोबाईल फोन बंद करून टाकल्यानंतर आपली फसवणूक झाल्याचे या ज्येष्ठ नागरिकाला लक्षात आले. त्यानंतर त्यांनी नवी मुंबई सायबर पोलीस ठाण्यात धाव घेऊन तक्रार दाखल केली. त्यानुसार सायबर पोलिसांनी या प्रकरणातील टोळीचा शोध सुरू केला आहे.

logo
marathi.freepressjournal.in