
शहरातील कोणताही घटक लसीकरणापासून वंचित राहू नये यासाठी नवी मुंबई महापालिकेकडून विशेष काळजी घेतली जात आहे. कोव्हीड लसीकरणाच्या प्रत्येक टप्प्यावर महापालिका आयुक्त अभिजीत बांगर यांच्या मार्गदर्शनाखाली शहरात पालिकेने योग्य नियोजन करीत जलद आणि मोठ्या प्रमाणावर लसीकरणाकडे विशेष लक्ष दिले आहे. दरम्यान, शासनाच्या मार्गदर्शक सूचनेनुसार शुक्रवार १५ जुलैपासून सुरु झालेल्या ‘कोव्हिड व्हॅक्सिन अमृत महोत्सवानिमित्ताने’ जन अभियान राबवले जात आहे. याअंतर्गत १८ वर्षावरील सर्व नागरिकांना ३० सप्टेंबरपर्यंत शहरातील सर्व शासकीय लसीकरण केंद्रांमध्ये प्रिकॉशन डोस मोफत देण्यात येणार असल्याचे नवी मुंबई महापालिकेकडून सांगण्यात आले. तर आतापर्यंत तब्बल १ लाख १ हजार ३१७ नागरिकांनी तिसरा डोस घेतल्याचे पालिकेकडून सांगण्यात आले.
केंद्र व राज्य शासनाच्या मार्गदर्शक सूचनांनुसार कोव्हीड १९ लसीचा दुसरा डोस व प्रिकॉशन डोस यामधील ९ महिने किंवा ३९ आठवडे हे अंतर कमी करण्यात आले आहे. यामुळे दुसरा डोस घेतल्यानंतर ६ महिने किंवा २६ आठवड्यांनी प्रिकॉशन डोस घेता येणार आहे. प्रिकॉशन डोसचा लाभ घेण्याचा कालावधी कमी केल्याने आता तो ३ महिने अगोदर घेता येणार असल्याने कोव्हीड लसीकरणाला अधिक गती मिळणार आहे. ज्या लाभार्थ्यांना लसीकरणाचा दुसरा डोस घेतल्यानंतर ६ महिने किंवा २६ आठवडे पूर्ण झाले असतील अशा सर्व लाभार्थ्यांना तिसरा म्हणजे प्रिकॉशन डोस देण्यात येणार असल्याचे पालिकेकडून सांगण्यात आले. दरम्यान, यापुढील काळात आजपासून म्हणजेच १६ जुलैपासून कोव्हिड व्हॅक्सिन अमृत महोत्सव अंतर्गत मोफत प्रिकॉशन डोस मिळण्याची सुविधा नवी मुंबई महानगरपालिकेची ५ रुग्णालये म्हणजे वाशी, नेरुळ, ऐरोली तसेच माता बाल रुग्णालय बेलापूर आणि तुर्भे त्याचप्रमाणे २३ नागरी प्राथमिक आरोग्य केंद्रे व ESIS रुग्णालयात उपलब्ध करून देण्यात आली आहे.
नवी मुंबई क्षेत्रातील लसीकरण आकडेवारी
पहिला डोस - १३ लाख ८१ हजार २८१
दुसरा डोस - १२ लाख ३६ हजार ९८६
तिसरा डोस - १ लाख १ हजार ३१७ (प्रिकॉशन डोस)