कोल्ड स्टोरेजमधील अनधिकृत व्यापार बंद करा; व्यापारी, माथाडी यांची मागणी

मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीच्या आजूबाजूला असलेल्या कोल्ड स्टोरेजद्वारे अनधिकृत व्यापार होत आहे. हा व्यापार बंद व्हावा यासाठी निवेदन देऊनही कारवाई होत नसल्याने फळ बाजारातील व्यापारी आणि माथाडी कामगार यांनी शनिवारी मोर्चा काढून मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीच्या प्रशासनाचा निषेध केला.
कोल्ड स्टोरेजमधील अनधिकृत व्यापार बंद करा; व्यापारी, माथाडी यांची मागणी

नवी मुंबई : मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीच्या आजूबाजूला असलेल्या कोल्ड स्टोरेजद्वारे अनधिकृत व्यापार होत आहे. हा व्यापार बंद व्हावा यासाठी निवेदन देऊनही कारवाई होत नसल्याने फळ बाजारातील व्यापारी आणि माथाडी कामगार यांनी शनिवारी मोर्चा काढून मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीच्या प्रशासनाचा निषेध केला. या संदर्भात बाजार समितीच्या सचिवांना कारभाराविषयी संताप व्यक्त केला जात आहे.

फ्रंट ऑफ युनायटेड फ्रुट‌्स असोसिएशनच्या वतीने सचिवांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, ए.पी.एम.सी. फ्रुट मार्केट आवाराच्या परीसरामध्ये असलेल्या सर्व कोल्ड स्टोरेजमध्ये शेतमालाचा अनधिकृत व्यापार मोठ्या प्रमाणात चालत आहे. वास्तविक पाहता कोल्ड स्टोरेज हे फक्त माल साठवणुकीसाठी आहे. असे असून, सुद्धा तिथे अनधिकृतरीत्या परदेशातील/परराज्यातील आणि स्थानिक व्यापारी फळांचा अनधिकृत व्यवसाय करीत आहेत. आम्ही याबाबतच्या सर्व गोष्टी शासनाच्या व बाजार समिती प्रशासनाच्या निदर्शनास आणून दिल्या आहेत तरी सुद्धा कोणतीही कारवाई होत नाही, अशी खंत व्यक्त करण्यात आली आहे.

प्रशासनाच्या या हलगर्जीपणाच्या निषेधार्थ शनिवारी सकाळी फळ मार्केटमधून व्यापारी व कामगार यांनी एकत्र येऊन जी.एच.के., प्रभू हिरा कोल्ड स्टोरेजवर मोर्चा काढण्यात आला. माथाडी कामगार नेते शशिकांत शिंदे, बाळासाहेब बेंडे, संजय पानसरे यांच्यासह शेकडो, व्यापारी आणि माथाडी कामगार यावेळी उपस्थित होते.

logo
marathi.freepressjournal.in