नवी मुंबई-वर्ल्ड ट्रेड सेंटर बससेवेत अचानक कपात; प्रवाशांचे प्रचंड हाल
टीपीजी कृष्णन / नवी मुंबई
नवी मुंबईहून मुंबईतील वर्ल्ड ट्रेड सेंटर (कफ परेड) दरम्यान चालविली जाणारी नवी मुंबई महानगरपालिका परिवहन (एनएमएमटी) बस सेवा अचानक कपात केल्याने दररोज या मार्गावरून प्रवास करणाऱ्या प्रवाशांचे प्रचंड हाल होत आहेत. अनेक वेळा विनंती आणि निवेदने दिल्यानंतरही एनएमएमटी अधिकाऱ्यांकडून किंवा नवी मुंबई महानगरपालिका आयुक्तांकडून (एनएमएमसी) कोणतीही कारवाई झालेली नाही.
याआधी, नवी मुंबईहून वर्ल्ड ट्रेड सेंटरपर्यंत प्रत्येक मार्गावर चार बस धावत होत्या; परंतु अलीकडे त्या संख्येत कपात करून केवळ एक किंवा दोन बसच सुरू ठेवल्याने प्रवाशांची मोठीच गैरसोय होत असून त्यांचा दैनंदिन प्रवास विस्कळीत झाला आहे.
याबाबत अनेक प्रवाशांनी एनएमएमटीचे महाव्यवस्थापक योगेश कदमस्कर आणि एनएमएमसी आयुक्त डॉ. कैलास शिंदे यांच्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला, पण त्यांना कुठलाही प्रतिसाद मिळालेला नाही.
निधीअभावी घेतला निर्णय
मार्ग क्रमांक १०८ वरील दुसऱ्या बसचे नियमित प्रवासी असलेले वकील श्याम कल्याणकर यांनी सदर सेवा कपात करण्यास तीव्र विरोध दर्शविला आहे. तुर्भे एनएमएमटी डेपोचे व्यवस्थापक सुनील जगताप यांच्याशी दूरध्वनीवर चर्चा केल्यानंतर, कल्याणकर यांनी या अचानक झालेल्या सेवा रद्दबाबत मुंबई उच्च न्यायालयात दाद मागण्याचा इशारा दिला. या निर्णयामागे मोठे आर्थिक नुकसान आणि निधीअभावी घेतलेला निर्णय असल्याचे डेपो व्यवस्थापकांनी सांगितले.