नवी मुंबई : नेरूळ येथील शिरवणे गावात राहणाऱ्या भाविका प्रितम सुतार (२८) या विवाहितेने वाशीतील जुहूगावात राहणाऱ्या आपल्या आई वडिलांच्या घरामध्ये गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना उघडकीस आली आहे. शुक्रवारी दुपारी आई वडिल उपचारासाठी बाहेर गेले असताना घरामध्ये कुणीही नसताना भाविकाने गळफास घेऊन आत्महत्या केली. या आत्महत्येमागचे कारण अद्याप स्पष्ट झाले नसले तरी भाविकाने कौटुंबिक कारणावरून आत्महत्या केल्याचे बोलले जात आहे.
या घटनेतील मृत भाविका सुतार ही शिरवणे गावात पती व कुटुंबियासोबत राहत होती. चार दिवसांपूर्वी ती वाशीतील जुहूगावात राहणाऱ्या आई वडिलांच्या घरी आली होती. शुक्रवारी दुपारी १ वाजण्याच्या सुमारास भाविकाचे आई वडिल उपचारासाठी बाहेर गेलेले असताना, घरामध्ये एकटीच असलेल्या भाविकाने पहिल्या मजल्यावरील बेडरूममधील पंख्याला ओढणीच्या सहाय्याने गळफास घेऊन आत्महत्या केली. दरम्यान, उपचारासाठी डॉक्टरकडे गेलेले आई वडील घरी परतले असताना, त्यांना हा प्रकार निदर्शनास आला. भाविकाने कशामुळे आत्महत्या केली हे अद्याप स्पष्ट झालेले नाही. त्यामुळे वाशी पोलिसांनी याबाबत अकस्मात मृत्यूची नोंद करून पुढील तपासाला सुरुवात केली आहे.
जुहूगावात पंधरा दिवसात चार आत्महत्या
वाशीतील जुहूगावात आत्महत्येचे सत्र सुरूच असून या गावात आणखी एक आत्महत्येची घटना उघडकीस आली आहे. गत २२ डिसेंबर रोजी वाशीतील जुहूगावात राहणाऱ्या कमल विलास बेंडे या ५८ वर्षीय महिलेने मणक्याच्या आजारपणामुळे कंटाळून राहत्या इमारतीच्या टेरेसवरून खाली उडी टाकून आत्महत्या केली होती. त्यानंतर २६ डिसेंबर रोजी जुहूगावात राहणाऱ्या शिल्पा रमेश एकावडे (२०) या विवाहितेने अज्ञात कारणावरून राहत्या घरात गळफास घेऊन आत्महत्या केली होती. या घटनेपाठोपाठ त्याच दिवशी रात्रीच्या सुमारास जुहूगावात राहणाऱ्या अरुण सिंह या पंधरा वर्षीय मुलाने वाशी खाडीत उडी टाकून आत्महत्या केली आहे. त्यापाठोपाठ भाविका सुतार या विवाहितेने शुक्रवारी दुपारी आत्महत्या केली आहे.