सुझान केमोप्लास्ट कंपनी जळून खाक

एमआयडीसी अग्निशमन दलाच्या जवानांनी घटनास्थळी धाव घेऊन अर्ध्या तासात येथील आग विझवली.
सुझान केमोप्लास्ट  कंपनी जळून खाक

नवी मुंबई : पावणे एमआयडीसीतील सुझान केमिकल या कंपनीमध्ये शनिवारी दुपारी आग लागल्याची घटना घडली. या आगीत कुठल्याही प्रकारची जीवितहानी झाली नसली तरी, आगीमुळे सुझान केमोप्लास्ट कंपनी संपूर्ण जळून खाक झाली आहे. तसेच शेजारी असलेल्या एल. लिलाधर केमिकल कंपनीला देखील या आगीचा फटका बसला आहे. आग लागल्यानंतर एमआयडीसी अग्निशमन दल तसेच महापालिकेच्या अग्निशमन दलाच्या जवानांनी सहा तासाच्या अथक प्रयत्नानंतर आगीवर नियंत्रण मिळवले.

पावणे एमआयडीसीतील सुझान केमोप्लास्ट या केमिकल कंपनीमध्ये शनिवारी दुपारी १ वाजण्याच्या सुमारास केमिकल प्रोसेसिंगचे काम सु‌रू असताना, या कंपनीत आग लागली. यावेळी सदर कंपनीत काम करणाऱ्या कामगारांनी कंपनीतून बाहेर पळ काढला. सदर कंपनीमध्ये मोठ्या प्रमाणात केमिकल असल्याने आगीने थोड्याच वेळात रौद्ररूप धारण केले. त्यामुळे शेजारील एल. लीलाधर व महेक या दोन कंपन्यांना देखील आगीचा फटका सहन करावा लागला आहे. या आगीची माहिती मिळताच एमआयडीसी अग्निशमन दलाच्या जवानांनी घटनास्थळी धाव घेतली. अग्निशमन दलाच्या जवानांनी १२ बंब गाड्यांच्या सहाय्याने सहा तासांत आग आटोक्यात आणली. त्यानंतर अग्निशमन दलाच्या जवानांकडून याठिकाणी कुलिंगचे काम सुरू होते.

तुर्भे एमआयडीसीतील भंगाराच्या गोदामाला आग

तुर्भे एमआयडीसीतील गणपती पाडा येथील सी १२४ या भूखंडावर असलेल्या भंगार गोदामाला रात्री साडेदहा वाजण्याच्या सुमारास आग लागल्याची घटना घडली. सदर आगीत गोदामातील सर्व भंगार साहित्य जळून खाक झाले आहे. एमआयडीसी अग्निशमन दलाच्या जवानांनी घटनास्थळी धाव घेऊन अर्ध्या तासात येथील आग विझवली. सदर आग शॉर्टसर्किटमुळे लागल्याचा प्राथमिक अंदाज व्यक्त करण्यात येत आहे.

logo
marathi.freepressjournal.in