ऐरोलीतील अनधिकृत प्रार्थना स्थळावर कारवाई करा; सकल हिंदू समाजाचा विभाग अधिकाऱ्यांना घेराव

पालिका अधिकारी आणि स्थानिक नेते यांच्या वरदहस्तामुळे यावर कारवाई केली जात नाही. यासाठी ९ डिसेंबरला सकल हिंदू समाजाच्या वतीने ऐरोली विभाग कार्यालयावर जन आक्रोश मोर्चा काढण्यात आला होता
ऐरोलीतील अनधिकृत प्रार्थना स्थळावर कारवाई करा; सकल हिंदू समाजाचा विभाग अधिकाऱ्यांना घेराव
Published on

नवी मुंबई : ऐरोली येथील मैदान आणि उद्यानांसाठी राखीव असलेल्या भूखंडावर अनधिकृत प्रार्थना स्थळ बांधण्यात आले आहे. या प्रार्थना स्थळावर कारवाई करण्यासाठी सकल हिंदू समाजाच्या वतीने महापालिकेचे ऐरोली विभाग अधिकारी अशोक अहिरे यांना घेराव घातला होता. यापूर्वी डिसेंबर महिन्यात देखील कारवाईसाठी ऐरोली विभाग कार्यालयावर मोर्चा काढण्यात आला होता. त्यानंतर पालिकेने या बांधकामाला नोटीस बजावली होती; मात्र पुढे कोणतीही कारवाई केली नव्हती. त्यामुळे १६ फेब्रुवारी या दिवशी सायंकाळी ४ ते रात्री ३ वाजेपर्यंत अशोक अहिरे यांना विभाग कार्यालयात घेराव घालून या बांधकामावर कारवाई करण्याची मागणी केली.

ऐरोलीमध्ये सेक्टर ३ येथील भूखंड क्र.११ बी यावर २०१२ या वर्षापासून अनधिकृत प्रार्थना स्थळ आहे. विशेष म्हणजे पालिकेच्या उद्यान आणि मैदान यांसाठी राखीव जागेवर हे बांधकाम करण्यात आले आहे. पालिका अधिकारी आणि स्थानिक नेते यांच्या वरदहस्तामुळे यावर कारवाई केली जात नाही. यासाठी ९ डिसेंबरला सकल हिंदू समाजाच्या वतीने ऐरोली विभाग कार्यालयावर जन आक्रोश मोर्चा काढण्यात आला होता. त्यानंतर १२ डिसेंबर या दिवशी पलिका मुख्यालयात उपायुक्त राहुल गेठे सोबत बैठक झाली. त्यांनी या बैठकीत २० दिवसांत या प्रार्थना स्थळावर कारवाई करण्यात येईल,असे आश्वासन गेठे यांनी दिले होते; परंतु अद्यापपर्यंत यावर कोणतीही कारवाई करण्यात आली नाही.

तीव्र आंदोलन करण्याचा इशारा

सकल हिंदू समाजाच्या वतीने अशोक अहिरे यांना विभाग कार्यालयात घेराव घालून ठिय्या आंदोलन करण्यात आले. या बांधकामाच्या कारवाई विषयी कोणतीही आश्वासन मिळत नसल्याने रात्री उशिरापर्यंत हे आंदोलन चालू होते. अखेर पोलिसांनी मध्यस्थी केल्यानंतर या बांधकामावर कारवाई करण्याचे आश्वासन दिले आहे. त्यामुळे सकल हिंदू समजाच्यावतीने तात्पुरते ठिय्या आंदोलन स्थगित करण्यात आले. तसेच २४ फेब्रुवारीपर्यंत या बांधकामावर कारवाई न झाल्यास अधिक तीव्र आंदोलन करण्यात येईल, अशी चेतावणीही देण्यात आली आहे.

logo
marathi.freepressjournal.in