नवी मुंबईतील ५०० चौरस फुटांपर्यंतच्या घरांना करमाफी, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे आदेश; अटल सेतू प्रकल्पग्रस्तांना तातडीने आर्थिक मदत वाटप

आमदार गणेश नाईक नवी मुंबईतील जिव्हाळ्याच्या मागण्यांची सोडवणूक करण्यासाठी करीत असलेल्या पाठपुराव्याला अखेर यश आले असून नाईक यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची सह्याद्री अतिथीगृहात भेट घेतली.
नवी मुंबईतील ५०० चौरस फुटांपर्यंतच्या घरांना करमाफी, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे आदेश; अटल सेतू प्रकल्पग्रस्तांना तातडीने आर्थिक मदत वाटप
Published on

नवी मुंबई : आमदार गणेश नाईक नवी मुंबईतील जिव्हाळ्याच्या मागण्यांची सोडवणूक करण्यासाठी करीत असलेल्या पाठपुराव्याला अखेर यश आले असून नाईक यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची सह्याद्री अतिथीगृहात भेट घेतली. या बैठकीत नवी मुंबईच्या दृष्टीने अनेक महत्त्वाचे निर्णय घेण्यात आले. या निर्णयामध्ये ५०० चौरस फुटापर्यंतच्या घरांना मालमत्ता करमाफी देण्यात आली आहे. त्याचबरोबर नवी मुंबईसाठी आवश्यक भूखंड आरक्षित ठेवण्याचा निर्णय देखील घेण्यात आला आहे.

नवी मुंबईतील ५०० चौरस फुटापर्यंतच्या घरांना मालमत्ता करमाफी देण्याची मागणी आमदार नाईक यांनी लावून धरली होती. ती मान्य करण्यात आली असून त्याबाबतचे आदेश मुख्यमंत्री शिंदे यांनी बैठकीत दिले. या मालमत्ता करमाफीमुळे नवी मुंबईतील हजारो सर्वसामान्य नागरिकांना मोठा दिलासा मिळणार आहे. नवी मुंबई महापालिकेने तयार केलेल्या विकास आराखड्यामध्ये नागरी सोयी-सुविधांसाठी भूखंड आरक्षित करण्यात आलेली आहेत. परंतु, हे भूखंड विकण्याचा सपाटा सिडकोने लावला होता.

नवी मुंबईकरांना भविष्यात सोयी-सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी भूखंडांची आवश्यकता असल्याने नाईक यांनी सिडकोच्या भूमिकेचा विरोध करून शासनस्तरावर भूखंड विक्रीवर स्थगिती आणली होती. तसेच नवी मुंबईसाठी आवश्यक भूखंड आरक्षित ठेवण्याची मागणी केली होती. ही मागणी देखील मान्य झाली असून प्रस्तावित विकास आराखडा मंजूर करतेवेळी महापालिकेकडून मागणी झालेले मात्र सिडकोने विकलेले सुविधा भूखंडाचा प्रश्न मार्गी लावावा, असे निर्देश मुख्यमंत्री शिंदे यांनी दिले आहेत.

न्हावा-शेवा अटल सेतुमुळे व्यावसायिक नुकसान झालेल्या मच्छीमार बांधवांना तातडीने आर्थिक मदत मिळावी, अशी मागणी नाईक यांनी केली होती. या अनुषंगाने मुख्यमंत्र्यांनी तातडीने आर्थिक मदत वाटपाचे आदेश दिले आहेत. या बैठकीला माजी खासदार संजीव नाईक, शासकीय, सिडको, महापालिका, एमएमआरडीए, एमएसआरडीसी, मेरीटाईम बोर्ड, एमआयडीसी आदी विभागांचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.

ऐरोली-काटई मार्गिकेचे काम लवकरच

ऐरोलीवरून कल्याण-डोंबिवली काटईकडे जाणाऱ्या उन्नत मार्गाचा वापर नवी मुंबईकरांना करता आला पाहिजे, याकरिता मुंबई आणि काटईकडील दोन्ही बाजूंनी चढण्यासाठी आणि उतरण्यासाठी मार्गिका बांधण्याकरिता आमदार नाईक यांनी आक्रमक भूमिका घेतली होती. काटईकडील दोन्ही मार्गिका तयार झाल्या असून आता मुंबईकडील मार्गिका बांधण्याचे काम तातडीने हाती घेण्यात येणार आहे.

अक्षता आगासकरप्रकरणी उज्ज्वल निकम यांची नियुक्ती

नवी मुंबईतील अक्षता आगासकर या भगिनीच्या अत्याचार आणि हत्या प्रकरणात नराधमांना फाशीची शिक्षा व्हावी, यासाठी नाईक यांनी हा खटला फास्ट ट्रॅकवर चालवून याप्रकरणी उज्ज्वल निकम यांची नियुक्ती करण्याची मागणी मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांकडे केली होती. या मागणीनुसार आता उज्ज्वल निकम यांची विशेष वकील म्हणून नियुक्त करण्याचे आदेश मुख्यमंत्री शिंदे यांनी दिले आहेत.

बीएमटीसी कामगारांसाठी ऐच्छिक योजना

प्रकल्पग्रस्तांनी आजपर्यंत केलेली गरजेपोटीची सर्व बांधकामे जमिनीचा मालकी हक्क देऊन नियमित करण्याची मागणी नाईक यांनी या बैठकीत केली. सिडकोच्या बंद पडलेल्या बीएमटीसी परिवहन सेवेतील कामगारांना उदरनिर्वाहासाठी योजना लागू व्हावी, याकरिता आमदार नाईक यांचा पाठपुरावा सुरू होता. या महत्त्वाच्या विषयावरही निर्णय झाला असून १०० चौरस फुटांचे गाळे किंवा दहा लाख रुपये अशी ऐच्छिक योजना या कामगारांसाठी लागू करण्यात येणार आहे.

logo
marathi.freepressjournal.in