नवी मुंबई : तळोजा एमआयडीसीत माल भरण्यासाठी टेम्पो घेऊन आलेल्या चालकाला चाकूचा धाक दाखवून टेम्पो घेऊन पळून जाण्याच्या प्रयत्नात असलेल्या लुटारुला पोलिसांनी अटक केली आहे. ही घटना तळोजा एमआयडीसीत घडली. सुरज गणेश कांबळे (२०) असे या लुटारूचे नाव असून तळोजा पोलिसांनी त्याला जबरी चोरीच्या गुन्ह्याखाली अटक केली आहे.
या घटनेतील तक्रारदार टेम्पोचालक महेंद्र पटेल (२७) नालासोपारा भागात राहण्यास असून शुक्रवारी तळोजा एमआयडीसीतील दीपक फर्टिलायझर कंपनीत रिकामा टेम्पो घेऊन माल भरण्यासाठी येत होता. यावेळी तो शिळफाटा मार्गे मुंब्रा-पनवेल मार्गावरील आरएएफ सिग्नलजवळ आल्यानंतर त्याने लघुशंका करण्यासाठी रस्त्यालगत आपला टेम्पो उभा केला होता. लघुशंका केल्यानंतर महेंद्र टेम्पोत चढत असताना, आरोपी सुरज कांबळे याने त्याला लोखंडी सुऱ्याचा धाक दाखवून त्याठिकाणी लघवी केल्याने २ हजार रुपये दंड द्यावा लागेले अशी धमकी दिली. त्यानंतर त्याने महेंद्रच्या खिशातील मोबाईल फोन जबरदस्तीने काढून घेतला. त्यानंतर सुरज कांबळे याने टेम्पोचा ताबा घेऊन केबिनची झडती घेण्यास सुरुवात केली.
मात्र त्याला गाडीत पैसे न सापडल्याने त्याने महेंद्रला त्याच्या मालकाकडून गुगल पेवर ५ हजार रुपये मागवून घेण्यास बजावले. त्यानंतर त्याने महेंद्रचा टेम्पो तळोजा फेज-२ कडे चालवून नेण्याचा प्रयत्न केला. मात्र त्याठिकाणी ट्राफिक जाम असल्याचे लक्षात आल्यानंतर महेंद्रने संधी साधून आरडा-ओरड सुरू केली. त्यामुळे त्या भागात असलेले काही लोक त्याच्या मदतीस धावून आल्यानंतर त्यांनी सुरज कांबळे याला पोलिसांच्या स्वाधीन केल्यानंतर पोलिसांनी त्याला जबरी चोरीच्या गुन्ह्याखाली अटक केली.