ठाण्यातून विजय नाहाटा यांना उमेदवारी देण्यासाठी कार्यकर्ते आग्रही

लोकसभा मतदारसंघात सर्वांना परिचित उमेदवाराची निवड व्हावी यावर महायुतीत एकविचार आहे. ठाणे शिवसेना शिंदे गटाकडे राहणार हे निश्चित झाले असल्याने तगड्या उमेदवाराची चाचपणी सुरू झाली. हीच बाब नाहाटा यांच्या पथ्यावर पडली आहे अशी माहिती माजी विरोधी पक्ष नेते दिलीप घोडेकर यांनी दिली.
ठाण्यातून विजय नाहाटा यांना उमेदवारी देण्यासाठी कार्यकर्ते आग्रही

नवी मुंबई : ठाणे लोकसभा निवडणुकीत अद्याप महायुतीचा तिढा कायम आहे. कुठल्याही एका नेत्याला युतीतील सर्व पक्षीय सहमती मिळत नसल्याची चर्चा असतानाच आता शिवसेना उपनेते विजय नाहाटा यांचेही नाव चर्चेत आले आहे. नाहाटा हे पूर्ण ठाणे जिल्ह्यात राजकीय नेते ते सामान्य जनता या सर्वांना परिचित आहेत. याच कारणाने शिवसेनेतील कार्यकर्तेही नाहाटांबाबत आग्रही आहेत.

निवृत्त प्रशासकीय अधिकारी असलेले नाहटा यांनी यापूर्वी नवी मुंबई आयुक्त म्हणून केलेल्या कामाची दखल आजही नवी मुंबईतील नागरिक घेतात. मनपा आयुक्त कोकण आयुक्त ते मुख्यमंत्री स्वीय सहाय्यक अशा पदांवर त्यांनी काम केल्याने प्रशासकीय दांडगा अनुभव आणि त्याच बरोबर पकड आजही आहे.

लोकसभा मतदारसंघात सर्वांना परिचित उमेदवाराची निवड व्हावी यावर महायुतीत एकविचार आहे. ठाणे शिवसेना शिंदे गटाकडे राहणार हे निश्चित झाले असल्याने तगड्या उमेदवाराची चाचपणी सुरू झाली. हीच बाब नाहाटा यांच्या पथ्यावर पडली आहे अशी माहिती माजी विरोधी पक्ष नेते दिलीप घोडेकर यांनी दिली.

शिवसेना उपनेते विजय नाहाटा यांचे नाव विचारात असल्याची चर्चा सुरु झाली आहे. सर्वच पक्षीय नेते ते कार्यकर्ते यांना परिचित आहेत शिवाय ठाणे जिल्ह्यात त्यांनी सनदी अधिकारी म्हणून काम केल्याने त्यांचा सामान्य नागरिकांशी थेट संबंध येत होता. शिवाय नवी मुंबई मनपात आयुक्त म्हणून काम करताना त्यांनी राबवलेले स्कुल व्हिजन, तलाव व्हिजन, गार्डन व्हिजन स्वच्छता व्हिजन हे एक आदर्श उपक्रम देशभरात नावाजले गेले. लोकाभिमुख काम करणारे आयुक्त अशीच त्यांची ओळख आहे. आपल्या कामाची छाप पाडलेले असल्याने त्यांना मतदार निश्चित पसंती देतील असा होरा आहे अशी प्रतिक्रिया शिवसेना शहर प्रमुख विजय माने यांनी दिली.

किशोर पाटकर (संपर्क प्रमुख नवी मुंबई) यांनी सांगितले की, विजय नाहाटा यांनी सनदी अधिकारी म्हणून केलेले काम, निष्कलंक चारित्र्य आणि प्रशासनावर आजही पकड असलेले व्यक्तिमत्त्व आहे. सर्वात महत्त्वाचे सर्वांना सोबत घेऊन जाणारे ते असल्याने ठाणे जिल्ह्याचे प्रश्न लोकसभेत ते उत्तम मांडू शकतात याचा फायदा ठाणेकरांना नक्कीच होईल.

logo
marathi.freepressjournal.in