ऐन उकाड्यात ठाणे, नवी मुंबईकरांची बत्तीगुल; ऐरोलीत रास्ता रोको आंदोलन

ठाण्यातील कलर कॅम्प या सब स्टेशन येथील ट्रान्सफॉर्मर ट्रीप झाल्याने बुधवारी ऐन दुपारी तब्बल अडीच तास ठाणे शहरातील काही भागातील बत्तीगुल झाली होती. आधीच वाढत्या उष्णतेच्या बसणाऱ्या झळा, त्यात बत्तीगुल झाल्याने नागरिक चांगलेच हैराण झाले होते.
ऐन उकाड्यात ठाणे, नवी मुंबईकरांची बत्तीगुल; ऐरोलीत रास्ता रोको आंदोलन

ठाणे : सध्या राज्यात उष्णतेच्या झळा तीव्रतेने बसत असल्यामुळे नागरिक मोठ्या प्रमाणात त्रस्त झाले आहे. त्यात ठाणे, नवी मुंबई येथे उष्णतेचा पारा ४१-४२ एवढा असल्याने अंगाची लाहीलाही होत असल्याचे चित्र पहावयास मिळत आहे. बाहेर उष्णतेचा मारा सुरू असताना घरात वीज नसल्यामुळे नागरिकांना प्रचंड हाल सोसावे लागत आहे. ऐन उकाड्यात विद्युत पुरवठा खंडीत होण्याच्या घटना सतत घडत असल्याने नागरिकांमध्ये मोठ्या प्रमाणात नाराजी पसरली आहे.

ठाण्यातील कलर कॅम्प या सब स्टेशन येथील ट्रान्सफॉर्मर ट्रीप झाल्याने बुधवारी ऐन दुपारी तब्बल अडीच तास ठाणे शहरातील काही भागातील बत्तीगुल झाली होती. आधीच वाढत्या उष्णतेच्या बसणाऱ्या झळा, त्यात बत्तीगुल झाल्याने नागरिक चांगलेच हैराण झाले होते. विशेष म्हणजे अनेकांनी राम नवमीची सुट्टी असल्याने हॉटेल्समध्ये जेवायचा प्लॅन केला होता. मात्र ठाण्यातील बहुतांश हॉटेलमध्ये देखील लाईट नसल्याने नागरिकांना गर्मीमध्ये जेवण करावे लागले.

ठाण्यातील कलर कॅम्प येथील महा ट्रान्सकोच्या सब स्टेशनमधून महावितरण विभागाला विद्युत पुरवठा केला जातो. नंतर तेथून तो पुरवठा महावितरण आपल्या ग्राहकांना पुरवत असतो. त्यात बुधवारी महा ट्रान्सकोच्या सब स्टेशनमध्ये ट्रीप झाल्याने ठाणे शहरातील नौपाडा, पाचपाखाडी, तलावपाळी, माजिवाडा आणि घोडबंदर रोड परिसरातील काही भागातील बत्तीगुल झाली होती. दुपारी १.३० वाजेच्या सुमारास वीजप्रवाह खंडित झाला होता. त्यात मागील दोन दिवसापासून ठाणे शहरातील तपमानाचा पार हा ४० अंश सेल्सियसच्यावर पोहोचला आहे. त्यामुळे उष्णतेत चांगलीच वाढ झाली आहे. नागरिकांच्या अंगाची लाहीलाही होत आहे.

बुधवारी दुपारच्या वेळेस विद्युत पुरवठा खंडित झाल्याने नागरिकांचे चांगलेच हाल झाल्याचे दिसून आले. लहान मुले देखील उकाड्यामुळे हैराण झाले होते. या संदर्भात महावितरण विभागाच्या अधिकाऱ्यांना विचारले असता, कलर कॅम्प या सब स्टेशन येथील ट्रान्सफॉर्मर ट्रीप झाल्याने विद्युत पुरवठा खंडित झाला असल्याचे त्यांनी सांगितले. तब्बल अडीच तास ठाण्यातील बहुतेक भागात वीजपुरवठा खंडित झाला होता. त्यामुळे नागरिकांना अनेक अडचणींना तोंड द्यावे लागले.

नवी मुंबईत उन्हाचा पारा ४१ पर्यंत गेल्याने एकीकडे लाहीलाही होत असताना महावितरणने विद्युत पुरवठा खंडित केला. त्यात महावितरणकडून कुठलाच संपर्क होत नसल्याने ऐरोली नोडमधील नागरिकांनी रात्री ११ वाजता रास्ता रोको आंदोलन केले तर मनसेने महावितरण कार्यालयात जाऊन मनसे स्टाईलने आंदोलन केले. रास्ता रोको केल्याने सुमारे एक तास वाहतूककोंडी झाली होती. अखेर पोलिसांच्या मध्यस्थीने आंदोलकांना बाजूला करण्यात आले. घनसोलीत सलग १८ तास वीजपुरवठा खंडित होता तर मंगळवारी संध्याकाळी सहा वाजता ऐरोली नोडचा वीजपुरवठा खंडित झाला. रात्री दहा वाजले तरी वीजपुरवठा सुरू न झाल्याने नागरिकांनी आक्रोश केला.

त्यात महावितरण कार्यालयाचा फोन बंद तर मोबाईल कोणीही उचलत नव्हते. याबाबत जाब विचारण्यास नागरिक महावितरण कार्यालयात गेले असता उद्धट आणि उडवाउडवीची उत्तरे दिली जात होती. त्यामुळे जमाव अधिक संतप्त झाला व त्यांनी नवी मुंबई - मुलुंड मार्गावर दिवा नाका येथे रास्ता रोको आंदोलन सुरू केले.

तांत्रिक अडचणीने वीजपुरवठा खंडित होऊ शकतो हे आम्हालाही समजते. मात्र महावितरण अधिकारी निर्ढावलेले असल्याने नागरिकांना नीट उत्तरे देत नाहीत. केवळ माजी नगरसेवकांना वीज कधी जाणार-येणार हे कळवले जाते. त्यामुळे सामान्य नागरिक रस्त्यावर उतरला. एवढी घटना होऊनही एकही लोकप्रतिनिधी फिरकला नाही.

-निलेश बानखिले, शहर प्रमुख मनसे

पोलिसांच्या आश्वासनानंतर आंदोलन मागे

ज्या मार्गावर रास्ता रोको केले,त्या मार्गावर रात्री १० नंतर नाशिक-नगर-पुणे-नवी मुंबई ते मुंबई एमआयडीसी अशी जड-अवजड वाहनांची प्रचंड वर्दळ असते. नेमका हाच मार्ग रोखून धरल्याने दोन्ही बाजूंनी सुमारे एक किलोमीटरपर्यंत वाहनांच्या रांगा लागल्या होत्या. शेवटी महावितरणने आश्वासन दिल्यानंतर पोलिसांच्या मध्यस्थीने हे आंदोलन मागे घेण्यात आले.

Related Stories

No stories found.
logo
marathi.freepressjournal.in